पावणे दोन लाख रुपये जप्त : मध्यरात्री जुगारी अड्डय़ावर छापा, पोलीस उपायुक्तांचा पुढाकार
प्रतिनिधी / बेळगाव
राजहंस गल्ली, अनगोळ येथील बोळात सुरु असलेल्या एका जुगारी अड्डय़ावर छापा टाकून 22 जुगाऱयांना अटक करण्यात आली आहे. रविवारी मध्यरात्री पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली असून 1 लाख 85 हजार 910 रुपये जप्त करण्यात आले आहे.
टिळकवाडी पोलीस स्थानकात या संबंधी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी रोख रक्कम, जुगाराच्या साहित्याबरोबरच 14 मोबाईल संचही जप्त केले आहेत. अटक करण्यात आलेले सर्व 22 जण बेळगाव शहर व उपनगरांतील आहेत. पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन यांनी एका पत्रकाव्दारे ही माहिती दिली आहे.
राजहंस गल्ली, अनगोळ येथील सदानंद मठाशेजारी असलेल्या बोळात अंदर-बाहर जुगार सुरु असल्याची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांच्या नेतृत्वाखाली टिळकवाडीचे पोलीस निरीक्षक विनायक बडीगेर व त्यांच्या सहकाऱयांनी मध्यरात्री 1.15 वाजण्याच्या सुमारास अचानक छापा टाकून ही कारवाई केली.
गेल्या आठवडय़ात डॉ. विक्रम आमटे पोलीस उपायुक्तपदी रुजू झाले आहेत. मटका, जुगारी अड्डय़ावर त्यांनी स्वतःच कारवाईचा सपाटा सुरु केला आहे. यापूर्वी अड्डे चालविण्यासाठी खुली सुट देण्यात आली होती. आता असे अड्डे शोधून काढुन कारवाई करण्याचा सपाटा पोलीस उपायुक्तांनी सुरु केला आहे. या कारवाईने एकच खळबळ माजली आहे.
मंजूर रसुलसाब चोपदार (रा. झटपट कॉलनी, अनगोळ), प्रदीप विष्णू लाटुकर (रा. संतमीराजवळ, अनगोळ), मोहीज अब्दुलरहीम गच्चवाले (रा. विरभद्रनगर), विजय कल्लाप्पा पाटील (रा. सह्याद्रीनगर-जैतुनमाळ), परशुराम बाबु मेत्री (रा. आंबेडकरनगर, अनगोळ), सुशील शेखर मुधोळकर (रा. राजहंस गल्ली, अनगोळ), बाबु चंद्रकांत यादव (रा. रघुनाथपेठ, अनगोळ), अनिल मष्णू येळ्ळूरकर (रा. संतमीरा रोड), किसन पवन पाटील (रा. संतमीरा रोड), जहांगीरखान बाशाखान पठाण (रा. कुरबर गल्ली, अनगोळ), विजय अण्णाप्पा शिंदोळकर (रा. रघुनाथपेठ, अनगोळ), दीपक शिवाजी होन्याळकर (रा. सुभाष गल्ली, गांधीनगर), आकाश परशराम जक्काने (रा. संभाजी गल्ली, मुचंडी), विनायक परशराम गणाचारी (रा. महात्मा फुले रोड, येळ्ळूर), सागर पंडीत मुतगेकर (रा. लक्ष्मी गल्ली, बेळगाव), समील अब्दुलखादर तहसीलदार (रा. राजहंस गल्ली, अनगोळ), सदानंद परशराम असलकर (रा. भांदुर गल्ली, अनगोळ), हिदायशेट महम्मदशरीफ शेख (रा. कुरबर गल्ली, अनगोळ), परशराम मालोजी लोहार (रा. उद्यमबाग), अभी चिदंबर बोगार (रा. नाथ पैनगर, अनगोळ), वासीम फत्ते (रा. अनगोळ), संदीप मुधोळकर (रा. अनगोळ) अशी अटक करण्यात आलेल्या 22 जणांची नावे आहेत.