50:50 योजना राबविण्यासाठी हालचाली
प्रतिनिधी/ बेळगाव
अनगोळ परिसरात वसाहत निर्माण करण्याचा निर्णय बुडाने घेतला आहे. मागील बैठकीत योजना क्र. 62 राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यादृष्टीने बुधवारी बुडा अध्यक्ष घुळाप्पा होसमनी, आयुक्त प्रीतम नसलापुरे यांनी अधिकाऱयांसमवेत पाहणी केली. 50:50 या तत्त्वावर योजना राबविण्याच्या हालचाली असल्याने पाहणीदौरा करण्यात आला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
अनगोळ येथील योजना क्र. 62 राबविण्यासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. मात्र, यामध्ये बुडाला यश आले नाही. जमीन मालकांनी व शेतकऱयांनी योजना राबविण्यास आक्षेप घेऊन विरोध केला होता. सर्वेक्षण करण्यास गेलेल्या अधिकाऱयांना परत पाठविले होते. त्यामुळे ही योजना राबविण्यात बुडाला यश आले नाही. त्यामुळे हा प्रस्ताव कित्येक वर्षांपासून बारगळला आहे. पण यापूर्वी प्राथमिक नोटीस बजावण्यात आलेल्या योजना राबविण्याच्या मुद्दय़ावर बुडाच्या बैठकीत चर्चा झाली होती. बेनकनहळ्ळी, हिंडलगा, अनगोळ, झाडशहापूर, जैतनमाळ अशा विविध परिसरातील वसाहत योजना राबविण्यासाठी भू-संपादन करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला होता. पण याबाबत आता हालचाली सुरू झाल्या आहेत.
बुडा अध्यक्ष घुळाप्पा होसमनी व आयुक्त प्रीतम नसलापुरे यांनी बुधवारी अनगोळ परिसरातील जागेची पाहणी करून आढावा घेतला. येळ्ळूर रोड ते अनगोळपर्यंतच्या मधल्या टप्प्यात असलेल्या 142 एकरमध्ये ही योजना राबविण्याचा प्रस्ताव आहे. 50:50 या तत्त्वावर जागा मालकांनी जमिनी दिल्यास योजना क्र. 62 राबविण्याचा विचार बुडाने चालविला आहे. त्याकरिता पाहणी करण्यात आली. प्रमुख रस्त्याशेजारी असलेल्या जागेमध्ये काही लेआऊट्स निर्माण करून घरे बांधण्यात आली आहेत. या ठिकाणी संपर्क रस्ते व आवश्यक सुविधा देखील उपलब्ध नाहीत. त्यामुळे ही योजना राबविण्याच्यादृष्टीने चर्चा करण्यात आली. योजनेच्या आराखडय़ाची माहिती बुडा अध्यक्ष घुळाप्पा होसमनी यांनी घेतली. तसेच याबाबत सविस्तर चर्चा करून निर्णय घेण्याचे ठरविण्यात आले. या पाहणीवेळी कार्यकारी अभियंते एम. व्ही. हिरेमठ, हेमंत हुबळी व इतर अधिकारी उपस्थित होते.