वेंगुर्ल्यात भाजप महिला मोर्चाचे पोलीस निरीक्षकांना निवेदन
वार्ताहर / वेंगुर्ले:
वेंगुर्ले शहरात पोलीस स्टेशनपासून अवघ्या 100 ते 200 मीटर अंतरात राजरोसपणे दारू विक्री सुरू आहे. दारूमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. यावर पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी, अन्यथा भाजप महिला मोर्चाच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मंगळवारी वेंगुर्ले पोलीस निरीक्षक तानाजी मोरे यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
वेंगुर्ले शहरासह तालुक्मयात अनधिकृत दारू विक्री सुरू आहे. याबाबत पोलिसांचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी भाजपच्या महिला मोर्चा तालुकाध्यक्ष स्मिता दामले यांच्यासह ऍड. सुषमा खानोलकर, नगरसेविका शीतल आंगचेकर, श्रेया मयेकर, कृपा मोंडकर-गिरप, साक्षी पेडणेकर, शहराध्यक्ष प्रार्थना हळदणकर, वृंदा गवंडळकर, राधा सावंत, आकांक्षा परब, हसिनाबेगम मकानदार, किर्तीमंगल भगत, सुस्मिता बेहरे, सुजाता देसाई यांच्यासह अन्य महिला पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी सर्वच महिलांनी तालुक्मयात सुरू असलेल्या अनधिकृत दारूधंद्याच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला. नगरसेविका शीतल आंगचेकर म्हणाल्या, रामघाट रोड येथे सुरू असलेल्या दारूधंद्याविषयी विचारणा केली असता पोलीस निरीक्षक मोरे यांनी आम्हाला माहीती नाही, असे सांगत आपण अशा ठिकाणांची नावे द्या, मी नक्की कारवाई करतो, असे सांगितले. तसेच पोलिसांबरोबरच एक्साईज विभागाचेही हे काम असल्याचे ते म्हणाले. यावर आंगचेकर म्हणाल्या, रामघाट येतील सदर व्यक्ती ‘आपण कुणाला घाबरत नाही आणि आमचा धंदा कोणी बंद करू शकत नाही’, असे छातीठोकपणे सांगत आहे. त्याचा शोध घेऊन बंदोबस्त करावा, अशी मागणी सर्वच महिलांनी यावेळी केली.