प्रतिनिधी/ धारबांदोडा
अनमोड घाटात गोवा-बेळगाव महामार्गावर शनिवारी सायंकाळी दरड कोसळल्याने संपूर्ण रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे. सायंकाळी 5.30 वा. च्या सुमारास ही घटना घडली. मोले चेकनाक्यापासून साधारण 12 कि. मी. अंतरावर ही दरड कोसळली आहे.
सध्या या मार्गावरुन तुरळक वाहतूक सुरु असली तरी दोन्ही बाजूने काही वाहने घाटात अडकून पडली होती. धारबांदोडा तालुक्याचे उपजिल्हाधिकारी प्रदीप नाईक, मामलेदार शर्मिला गावकर व इतर शासकीय अधिकाऱयांनी घटनास्थळी पाहणी करुन परिस्थितीचा आढावा घेतला. जेसीबीच्या साहाय्याने रस्त्यावरील मातीचा ढिगारा हटविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते. पावसाचा जोर कायम असल्याने ढिगारा उपसण्याच्या कामात अडथळे येत आहेत, अशी माहिती उपजिल्हाधिकाऱयांनी दिली. सध्या ज्या गतीने मदतकार्य सुरु आहे ते पाहिल्यास पहाटेपर्यंत रस्ता वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता कुळेचे पोलीस निरीक्षक प्रज्योत फडते यांनी व्यक्त केली आहे.