जीवितहानी टळली : वाहनाचे मोठे नुकसान
वार्ताहर /रामनगर
अनमोड घाटातून गोव्याहून कागदाचा कच्चा माल घेवून येणाऱया वाहनाच्यासमोर कर्नाटक हद्दीत अचानक दुसरे वाहन आल्याने सदर वाहन बाजूला घेण्याच्या नादात थेट दरीत कोसळल्याची घटना मंगळवारी पहाटे 5 वाजता घडली. या अपघातात जीवितहानी झाली नसली तरी वाहनांचे मात्र मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे.
अनमोड घाट मार्ग हा अवजड वाहनांना सुरक्षित नसल्याने जिल्हाधिकारी यांच्याकडून या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. तरी सध्या हलक्या वाहनांना सदर मार्ग खुला करण्यात आला आहे. परंतु सदर मार्गाचे काम अर्धवट स्थितीत आहे. अनमोड घाटात पूर्वी काम केलेल्या दिलीप बिल्डकाँन कंपनीने बनवलेला रस्ता हा बऱयाच ठिकाणी घाटामध्ये खाली उतरत असल्याचे दिसून येत आहे. तसेच या घाटामध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूला संरक्षक कठडे नाहीत. त्याचबरोबर रस्ता अरुंद असल्यामुळे समोरून एखादे वाहन अचानक आल्यास वाहन रस्ता सोडून थोडेजरी खाली उतरविल्यास सरळ दरीतच कोसळत आहेत. त्यामुळे या घाटात संरक्षण कठडे तयार करण्याची वाहनधारकांतून मागणी करण्यात येत आहे.