ब्रिटनमधील स्थिती- तज्ञ देखील हैराण – अन्य देशांकडून होतेय अध्ययन
वृत्तसंस्था / लंडन
ब्रिटनमध्ये मागील 6 दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण घटत आहेत. साप्ताहिक काळात नव्या कोरोनाबाधितांमध्ये 21.5 टक्क्यांची घसरण दिसून आली आहे. ब्रिटनमध्ये 17 जुलै रोजी 54,674 नवे रुग्ण सापडले होते. तर 26 जुलै 24,950 नवे बाधित आढळून आले आहेत. या नव्या स्थितीमुळे तज्ञही चकित झाले आहेत. पण रुग्णालयांमध्ये दाखल रुग्ण 27 टक्के आणि मृत्यू 50 टक्क्यांनी वाढले आहेत. संक्रमण कमी होत असल्याने रुग्णालयांमध्ये दाखल होण्याचे प्रमाणही कमी व्हायला हवे असे म्हणून तज्ञ शंका उपस्थित करत आहेत.
ब्रिटनमध्ये अनलॉकनंतर कोरोना संक्रमणाची तिसरी लाट येणार अशी भीती वैज्ञानिकांना होती. देशातील 70 टक्के प्रौढ व्यक्तींना कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले असले तरीही देशातील निम्म्या लोकसंख्येने पूर्ण लसीकरण करवून घेतलेले नाही. यात लाखो युवा आहेत. त्यांच्यामध्ये कोरोना संक्रमण वेगाने फैलावू शकते. ऑफिस ऑफ नॅशनल स्टॅटिस्टिक्सच्या अनुमानानुसार ब्रिटनमध्ये सुमारे 92 टक्के प्रौढांकडे लसीकरण तसेच अन्य कारणांमुळे संक्रमणाशी लढण्यासाठी पुरेशा प्रमाणात अँटीबॉडी आहेत. तर अनेक लोकांची संक्रमण प्रतिरोधक क्षमता चांगली आहे.
जुलै महिन्यात उन्हाळी सुटय़ांमुळे शाळा बंद आहेत. विद्यार्थ्यांचा परस्परांशी असणारा संपर्क कमी झाला आहे. यामुळे संक्रमणाचा फैलाव कमी झाला असण्याची शक्यता आहे. पण सध्या अनेक क्षेत्रांमध्ये कोरोनाच्या चाचण्याही कमी झाल्या आहेत. यामुळे नवे रुग्ण देखील कमी प्रमाणात नोंद झाले असावेत. अनेक ठिकाणी सुविधांच्या कमतरतेमुळे चाचण्या कमी झाल्या आहेत.
पिंगडेमिक
कठोरपणे लोकांना आयसोलेशनमध्ये पाठविण्याला ‘पिंगडेमिक’ म्हटले जाते. राष्ट्रीय आरोग्य सेवेने ऍपच्या माध्यमातून हजारो संशयास्पद संक्रमित लोकांचा शोध लावला आहे. या लोकांना आयसोलेशनमध्ये पाठविण्यात आले आहे. पण अनेक युवांनी आयसोलेशनमध्ये जाण्यास विरोध करत ऍप डिलिट केला आहे.
युरो कपचा प्रभाव
युरो कप स्पर्धेदरम्यान देशभरात संक्रमण वेगाने वाढले. विशेषकरून 15 ते 44 वयोगटातील पुरुषांमध्ये संक्रमणाचे प्रमाण अधिक होते. हजारो लोक स्टेडियम, बार आणि पबमध्ये एकत्र होऊन सामना पाहत होते. पण युरो कप स्पर्धेनंतर 17 जुलैपासून नव्या कोरोनाबाधितांची संख्या कमी होऊ लागली आहे.
हवामानाशी संबंध?
विषाणूचे संक्रमण सर्वसाधारणपणे उन्हाळय़ात कमी होऊ लागते. ब्रिटनमध्ये उष्णलाटेमुळे संक्रमण मंदावले असण्याचीही शक्यता आहे. पण इतर कारणेही असू शकतात असे उद्गार लिव्हरपूल युनिव्हर्सिटीचे तज्ञ प्राध्यापक इयान बुकान यांनी काढले आहेत. ब्रिटनमध्ये 19 जुलै रोजी अनलॉक करण्यात आले होते. 2 ऑगस्ट रोजी सुरू होणाऱया आठवडय़ात याचा प्रभाव स्पष्ट होऊ शकणार नाही. पुढील काही महिन्यांमध्ये अनेक आणखी पीक (संक्रमणाची अत्युच्च पातळी) दिसेल असे लंडन स्कूल ऑफ हायजीन अँड ट्रॉपिकल मेडिसीनचे प्राध्यापक ग्राहम मेडली यांनी म्हटले आहे.