प्रतिनिधी/ बेळगाव
महापालिकेच्या व्यापारी संकुलांमधील गाळे भाडेतत्वावर देण्यात आले आहेत. 2011 मध्ये नगरविकास खात्याने दिलेल्या आदेशानुसार भाडे ठरवून अनामत रक्कम भरण्याची सूचना गाळेधारकांना करण्यात आली होती. मात्र 440 पैकी 354 गाळेधारकांनी अनामत रक्कम भरली नाही. येत्या पंधरा दिवसांमध्ये अनामत रक्कम न भरल्यास गाळेधारकांवर कारवाई करण्यासाठी महापालिका मोहीम राबविणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
महापालिकेच्या खजिन्यात खडखडाट असल्याने थकीत भाडे वसूल करण्याबरोबर गाळेधारकांकडून अनामत रक्कम वसूल करण्याची मोहीमदेखील हाती घेण्यात आली आहे. सध्या थकीत भाडे वसूल करण्यासाठी मनपाच्या विविध व्यापारी संकुलांमधील गाळय़ांना टाळे ठोकण्याची कारवाई केली आहे. तसेच अनामत रक्कम भरणा करण्यासाठी गाळेधारकांना नोटीस बजावण्यात आली आहे. दिलेल्या मुदतीत अनामत रक्कम भरणा न केल्यास कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. सदर मोहीम पंधरा दिवसांनंतर राबविण्यात येणार आहे. महापालिकेने 440 गाळे भाडेतत्वावर दिले असून यापैकी 354 गाळेधारकांनी अनामत रक्कम भरणा केली नाही. त्यामुळे 3 कोटीचा महसूल थकला असल्याने वसुलीसाठी आता मोहीम हाती घेण्यात येणार आहे.
48 लाख रुपये भाडे जमा
थकीत भाडे वसुलीसाठी टाळे ठोकण्याची मोहीम दि. 15 जानेवारीपासून सुरू करण्यात आली होती. गेल्या 20 दिवसांमध्ये महसूल विभागाने विविध ठिकाणच्या गाळय़ांना टाळे ठोकण्याची कारवाई केली. या दरम्यान 48 लाख रुपये भाडे जमा झाले आहे. गाळय़ांच्या भाडय़ाच्या माध्यमातून महापालिकेला दीड कोटीचा महसूल मिळतो. पण यंदा वसुली झाली नाही. यामुळे भाडे वसुलीकरिता महापालिका आयुक्तांनी कारवाईचा आदेश दिला आहे.