वार्ताहर / कास :
सातारा-कास रोडवरील शाळा चोरट्यांच्या निशान्यावर आल्या असून, चोरीचे सत्र अद्याप सुरुच आहे. शुक्रवारी रात्रीच्या वेळी अनावळेवाडी गावातील जिल्हापरिषदेच्या शाळेच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडुन शाळेतील टिव्ही व गॅस सिंलीडर चोरट्यांनी लंपास केला.
अनावळेवाडी गावात पहिली ते चौथीपर्यंत जिल्हा परिषदेची प्राथमीक शाळा असून, शुक्रवारी रात्रीच्या वेळी या शाळेच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून शाळेतील टिव्ही व भरलेला गॅस सिलिंडर चोरट्यांनी लंपास केला. ही घटना शनिवारी सकाळी शाळेच्या शिक्षिका राणी राऊत व काही विद्यार्थ्यांच्या निर्दशनास आली. पोलीस पाटील उमेश जानकर यांनी तालुका पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दिली आहे.
मागील दोन वर्षात कास रोडवरील जांभुळमुरे, पेट्री या शाळांमध्ये दोन वेळा, अंबाणी व जावली तालुक्यातील एकीव या शाळांमध्ये एकदा चोरीची घटना घडली आहे. या चोऱ्यांमध्येही गॅस, टिव्ही, संगणक आदी साहित्य लंपास केले होते. दोन वर्षे उलटून गेले तरीही हे चोरटे अद्याप पोलिसांच्या हाताला लागले नाहीत. त्यामुळे पोलिसांनी कसून तपास करून चोरट्यांच्या मुसक्या आवळाव्यात, अशी मागणी परिसरातील नागरीकांमधून होत आहे.