वडीच्या कुस्ती मैदानात चटकदार कुस्त्या
वार्ताहर/ औंध
कोंबडवाडी येथील अनिकेत चव्हाण याने अटीतटीच्या लढतीत सांगलीच्या शब्बीर शेखवर याला गुणावर पराभूत करून प्रथम क्रमांकाचे बक्षीस जिंकले. मैदानात छोटय़ा मल्लांनी चटकदार कुस्त्या करून उपस्थितांची वाहवा मिळवली.
वडी ता खटाव येथे ग्रामदैवत सिध्दनाथ यात्रेनिमित्त ग्रामस्थांनी कुस्ती मैदानाचे आयोजन केले होते. लहान गटातील पन्नासहून अधिक प्रेक्षणीय कुस्त्यांचा आनंद कुस्तीशौकिनांनी लुटला.
अनिकेत आणि शब्बीर यांची कुस्ती बराच वेळ रंगली मात्र निकाल लागत नसल्याने पंचानी गुणावर कुस्ती घेण्याचा निर्णय घेतला यामध्ये अनिकेतने पहिला गुण घेऊन बाजी मारली. अमोल साळुंखे याने आकाश माने याच्यावर मात केली.संग्राम सुर्यवंशी याने अतुल हिरवे यास पराभवाची धुळ चारली. अभय चव्हाण ऋषिकेश खबालेला भारी ठरला.पप्पू सुर्यवंशी यानेअक्षय चव्हाण याच्यावर मात केली.साईराज येवलेने अमर माने याला चितपट केले. करण येवले पुढे साहिल चव्हाणची डाळ शिजली नाही.
अतुल ननावरे, संग्राम यादव,विजय सुर्यवंशी, जय यादव,सुजित चव्हाण, वैभव येवले,प्रथमेश इंगळे, विजय कारंडे,विराज साळुंखे, आदित्य यादव, अजिंक्य येवले यांनी मैदानात चटकदार कुस्त्या केल्या. मैदानात महाराष्ट्र केसरी धनाजी फडतरे, पांडुरंग मांडवे यांचा सत्कार करण्यात आला.
विजेत्या मल्लांना संदीप येवले आणि पोपट टेलर यांनी ढाल बक्षीस दिली.यात्रा कमेटीने मैदान यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.