ऑनलाईन टीम / लखनऊ :
उत्तरप्रदेशच्या कानपूरमध्ये नियंत्रण सुटलेल्या इलेक्ट्रिक बसने तब्बल 17 वाहनांना जोरदार धडक दिली. या घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला असून, 12 जण जखमी आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. रविवारी रात्री 11.30 च्या सुमारास ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, कानपूर शहरातील घंटाघर चौकातून रात्री 11.30 च्या सुमारास ई-बस टाटमिलच्या दिशेने भरधाव वेगाने जात होती. पूल उतरताच चालकाने बस विरुद्ध दिशेनं चालवण्यास सुरुवात केली. बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने जो दिसेल त्याला तुडवत ती बस पुढे जात होती. ती बस एकामागोमाग एक अशा 17 गाडय़ांवर जाऊन धडकली. त्यानंतर ड्रायव्हरने घटनास्थळावरुन पलायन केले.
या बसने 2 कार, 10 दुचाकी, 2 ई-रिक्षा आणि 3 टेम्पोला धडक देत रस्त्यावरील लोकांनाही चिरडले. या दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला असून, 12 जण जखमी आहेत. जखमींपैकी 7 जणांना टाटमिल येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये आणि 4 जणांना हॅलेट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तर एक जण किरकोळ जखमी आहे.