सचिन जाधव यांनी मानले जि.प.कर्मचारी सोसायटीच्या संचालकांचे आभार
कोल्हापूर प्रतिनिधी
जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या संचालक मंडळाने सोसायटीच्या गडहिंग्लज शाखेमध्ये आर्थिक अनियमितता झाल्याचे मान्य करुन, जबाबदार शाखाधिकाऱयांवर जरुर ती कडक प्रशासकिय कारवाई करणार असल्याचे सांगीतले आहे. सदरची अर्थिक अनियमितता मान्य केल्याबद्दल मी सर्व संचालक मंडळाचे आभार मानतो, असे सोसायटीचे माजी संचालक सचिन जाधव यांनी पत्रकाद्वारे स्पष्ट केले.
पत्रकात म्हटले आहे, नोव्हेंबर-डिसेंबर 2021 पासून जि.प.सोसायटीच्या कारभारात अनियमितता सुरु आहे. संस्थेची दरमहा मासिक मिटींग घेतली जाते. प्रत्येक मिटिंगला प्रत्येक शाखेचा नफा तोटा पत्रक, ताळमेळ, तेरीज ताळेबंद सादर केला जातो. त्यावेळी सदर शाखेचा नफा तोटा पत्रक ताळेबंद प्राप्त झाला अगर कसे ? सदरचे नफा तोटा पत्रक व ताळेबंद चुकीचा सादर केला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही बाब गेली 3 महिने सुरु आहे. या कालावधीतील मिटींगमध्ये सादर करण्यात आलेली नफा तोटा पत्रके, ताळेबंद पाहून संचालकांनी मंजूर करणे आवश्यक होते. पण या बाबीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करुन संस्था व सभासद यांच्या हितास बाधा निर्माण केलेली आहे. त्यामुळे संचालक मंडळाने नैतिक जबाबदारी स्विकारुन राजीनामे दिले असते तर सर्व सभासदांनी आपला सन्मान केला असता.
संचालक मंडळाने अरुण मेथे, कुमार कांबळे, राहूल रेपे हे थकबाकीदार असून त्यांनी सोसायटीच्या कारभारावर बोलू नये असे म्हटले आहे. पण केवळ हे तीनच सभासद थकबाकीदार सभासद आहेत का ? याची माहिती द्यावी. सदरच्या व्यक्ती जरी थकबाकीदार असल्या तरी संस्थेच्या सभासद आहेत. त्यामुळे संस्थेचा कोणीही सभासद थकबाकीदार असला तरी त्यांच्या चोर म्हणून अवमान करणे अशोभनीय आहे. मेथे, रेपे व कांबळे हे जरी थकबाकीदार असले तरी ते सेवानिवृत्त झालेले नसून त्यांची अजून जि.प.कडील सेवा शिल्लक आहे. नाममात्र सभासदास कोणताही अधिकार नसताना पाटील हे संस्था कामकाजात का भाग घेतात ? संस्था पोटनियमानुसार सेवानिवृत्तीनंतर अथवा पदोन्नोतीने जिल्हा परिषद सेवेतून कार्यमुक्त होतात त्यांना संस्थेच्या कोणत्याही प्रक्रियेमध्ये भाग घेता येत नाही असे सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत संचालक मंडळानेच खुलासा केलेला आहे. तरीही काही मंडळी सेवानिवृत्तीनंतरही संस्थेच्या कामकाजात भाग घेत आहेत. संचालक मंडळावर कार्यरत असलेल्या पण स्वेच्छा सेवानिवृत्ती घेतलेल्या गौरी पाटील व पदोन्नती जि.प.सेवेतून शासन सेवेत गेलेले एम.आर.पाटील यांचे सभासद पद पोटनियमानुसार आपोआप रद्द होते. त्यामुळे त्यांना संचालक म्हणून कामकाजात भाग घेता येत नाही. तरी देखील ते आजही मासिक मिटींगला उपस्थित राहून संस्थेचा मिटींग भत्ता घेऊन नियमबाहयरित्या संस्था कामकाजात भाग घेतात. सदरची बाब संस्था पोटनियमानुसार चुकीची आहे. यापुढे संस्थेचे कामकाज संस्था पोटनियमानुसार संस्था व सभासद यांच्या हितास बाधा न येता सुरु रहावे हीच सुज्ञ सभासदांची प्रामाणिक मागणी असल्याचे जाधव यांनी पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.