वृत्तसंस्था/ सिडनी
भारत आणि ऑस्ट्रेलिया अ यांच्यातील तीन दिवसांचा दिवस-रात्रीचा सराव सामना रविवारी शेवटच्या दिवशी अनिर्णित राहिला. 17 डिसेंबरपासून सुरू होणाऱया ऍडलेडच्या दिवस-रात्रीच्या पहिल्या कसोटीपूर्वीची रंगीत तालीम म्हणून हा सामना आयोजित केला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलिया अ संघातील बेन मॅकडरमॉट आणि जॅक विल्डरमूथ यांची कामगिरी उठावदार झाली. या सामन्यात भारतीय संघालाही आपल्या कामगिरीचे समाधान मिळाले.
या सामन्यात भारताचा पहिला डाव 194 धावांवर आटोपला. त्यानंतर ऑस्ट्रेलिया अ संघाने पहिल्या डावात 108 धावा जमविल्या. भारताने दुसऱया डावात 4 बाद 386 धावा जमवित एकूण 472 धावांची आघाडी मिळविली. भारताच्या दुसऱया डावात हनुमा विहारी आणि ऋषभ पंत यांनी शानदार शतके झळकविली. रविवारी ऑस्ट्रेलिया अ ने आपल्या दुसऱया डावाला सुरूवात केली पण त्यांची स्थिती 3 बाद 25 अशी केविलवाणी झाली होती. त्यानंतर बेन मॅकडरमॉट आणि जॅक विल्डरमूथ यांनी शानदार शतके झळकविली. माजी क्रिकेटपटू पेग मॅडरमॉटचा लहान मुलगा बेनने 167 चेंडूत 107 धावा झळकविल्या. विल्डरमूथने 119 चेंडूत 111 धावा झळकविल्या. मॅडरमॉट आणि विल्डरमूथ यांनी 165 धावांची भागिदारी केली. कर्णधार ऍलेक्स कॅरेने 111 चेंडूत 58 धावा जमविताना चौथ्या गडय़ासाठी 117 धावांची भागिदारी केली. शेवटच्या दिवशीच्या खेळातील पहिल्या तासभरात भारतीय संघातील शमीने बर्न्सला तसेच हॅरीसला बाद केले. शमीने 58 धावांत 2 बळी मिळविले. मोहम्मद सिराजने 54 धावांत 1 गडी बाद केला. सैनीला एकही गडी बाद करता आला नाही. ऑस्ट्रेलिया अ ने दिवसअखेर 4 बाद 305 धावा जमवित हा सामना अनिर्णित राखला.
संक्षिप्त धावफलक
भारत प. डाव- सर्वबाद 194, ऑस्ट्रेलिया अ- सर्वबाद 108, भारत दु. डाव- 4 बाद 386 डाव घोषित, ऑस्ट्रेलिया अ दु. डाव. 4 बाद 305 (बेन मॅकडरमॉट 107, विल्डरमूथ 111, कॅरे 58, शमी 2-58, मोहम्मद सिराज 1-54).