इमाम-शफीकचा दोन्ही डावात शतकी भागीदारीचा विक्रम, उभय संघातील दुसरी कसोटी शनिवारपासून
वृत्तसंस्था/ रावळपिंडी
यजमान पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिली क्रिकेट कसोटी मंगळवारी खेळाच्या शेवटच्या दिवशी अनिर्णीत अवस्थेत संपली. या कसोटीत पाकचा सलामीचा फलंदाज इमाम उल हकने दोन्ही डावात शानदार शतके झळकविली. आता या मालिकेतील दुसरी कसोटी येत्या शनिवारपासून कराचीत सुरू होणार आहे.
तब्बल 24 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियन संघ प्रथमच पाकमध्ये कसोटी मालिका खेळत असल्याने शौकिनांमध्ये उत्साह निर्माण झाला होता. या पहिल्या कसोटीत अंधूक प्रकाश आणि पावसाळी वातावरणाने बराच खेळ वाया गेला. रावळपिंडीची खेळपट्टी फलंदाजीला अधिक अनुकूल असल्याने दोन्ही संघातील गोलंदाज प्रभावी ठरू शकले नाहीत. ऑस्ट्रेलिया आणि पाक यांनी आपल्या पहिल्या डावात 450 धावांचा टप्पा ओलांडला. पाकच्या इमाम उल हकने यापूर्वी म्हणजे 2019 साली नोव्हेंबर महिन्यातील शेवटची कसोटी खेळली होती.
इमाम उल हकचा सलामीचा साथीदार अब्दुला शफीकने पाकच्या दुसऱया डावात नाबाद शतक (136) झळकविले. त्याचे कसोटीतील हे पहिले शतक आहे. इमाम उल हकने पाकच्या पहिल्या डावात 157 तर दुसऱया डावात नाबाद 111 धावा झळकविल्या. शेवटच्या दिवशीच्या एक तासाचा खेळ बाकी असताना दोन्ही संघांच्या कर्णधारांनी खेळ थांबविण्याचा निर्णय घेतला.
या कसोटीत पाकने पहिला डाव 4 बाद 476 धावांवर घोषित केल्यानंतर ऑस्ट्रेलियाने 7 बाद 449 या धावसंख्येवरून खेळला पुढे सुरवात केली आणि त्यांचा पहिला डाव 140.1 षटकांत 459 धावांत आटोपला. मंगळवारी खेळाच्या शेवटच्या दिवशी पहिल्या चार षटकांतच पाकच्या गोलंदाजांनी ऑस्टेलियाचे उर्वरित तीन फलंदाज केवळ 10 धावांत बाद केले. पाकने पहिल्या डावात 17 धावांची आघाडी मिळविली.
पाकतर्फे 35 वर्षीय नौमन अलीने 107 धावांत 6 गडी बाद केले. नौमन अलीची कसोटीतील ही सर्वोच्च कामगिरी असून त्याची ही आठवी कसोटी आहे. यापूर्वी गेल्यावर्षी दक्षिण आफ्रिका संघाविरूद्ध कसोटीत पदार्पण करताना नौमन अलीने 35 धावांत 5 गडी बाद केले होते. शाहीन आफ्रिदीने 2, तर साजीद खान आणि नईम शहा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. ऑस्ट्रेलिया संघाविरूद्ध कसोटीमध्ये दोन्ही डावात सलामीच्या गडय़ासाठी शतकी भागीदारी करणारी इमाम उल हक आणि अब्दुला शफीक ही पाकची पहिली जोडी ठरली. या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज लियॉनने 78 षटकांत 236 धावा देत केवळ 1 गडी बाद केला. ऑस्ट्रेलियन गोलंदाज या खेळपट्टीवर प्रभावी कामगिरी करू शकले नाहीत.
17 धावांची आघाडी घेत पाकने आपल्या दुसऱया डावाला दमदार प्रारंभ केला. ऑस्ट्रेलियन गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेत या जोडीने 77 षटकांत अभेद्य 252 धावांची भागीदारी केली. कर्णधार कमिन्सने गोलंदाजीत वारंवार बदल केले. पण, पाकच्या या सलामीच्या जोडीला त्यांना शेवटपर्यंत फोडता आले नाही. अब्दुला शफीकने 242 चेंडूत 1 षटकार आणि 15 चौकारांसह नाबाद 136 तर इमाम उल हकने 223 चेंडूत दोन षटकार आणि 7 चौकारांसह नाबाद 111 धावा झळकविल्या. ऑस्ट्रेलियाचा संघ या दौऱयात तीन सामन्यांची कसोटी मालिका तसेच तीन वनडे सामने आणि एकमेव टी-20 खेळणार आहे.
संक्षिप्त धावफलक
पाक प. डाव 4 बाद 476 डाव घोषित, ऑस्टेलिया प. डाव 140.1 षटकांत सर्वबाद 459 (उस्मान ख्वॉजा 97, वॉर्नर 64, लाबुसिंघे 90, स्टीव्ह स्मिथ 78, ग्रीन 48, कॅरे 19, स्टार्क 13, नौमन अली 6-107, शाहीन आफ्रिदी 2-88, साजीद खान 1-122, नसीम शहा 1-89), पाक दु. डाव 77 षटकांत बिनबाद 252 (अब्दुला शफीक नाबाद 136, इमाम उल हक नाबाद 111).