मुंबई/प्रतिनिधी
महिन्याला १०० कोटी रुपये वसुलीचे आरोप असलेले राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांना सीबीआयच्या प्राथमिक तपासातून क्लिन चिट मिळाल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणामुळे राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. सीबीआयने याप्रकरणात ६५ पानांचा अहवाल सादर केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे चौकशीच्या फेऱ्यात अडकलेल्या देशमुखांना आता मोठी दिलासा मिळणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, या कागदपत्रांच्या विश्वासार्हतेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असताना आता मोठी माहिती समोर आली आहे.
क्लीन चीट दिल्याच्या अहवालावर सीबीआयने आपलं स्पष्टीकरण दिलं आहे. पुराव्यानुसार अनिल देशमुखांवर गुन्हा दाखल आहे आणि या प्रकरणी अद्याप तपास सुरु असल्याची माहिती सीबीआयने दिली आहे. केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) कडून आलेल्या एका पत्रात असे उघड झाले आहे की, काँग्रेसच्या दाव्याप्रमाणे महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना प्राथमिक तपासात क्लीन चिट देण्यात आली नव्हती. इंडिया टुडेच्या अहवालानुसार, पत्रात म्हटले आहे, “प्राथमिक तपासात असे उघड झाले आहे की या प्रकरणात एक अदखलपात्र गुन्हा करण्यात आला आहे. महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख आणि अज्ञात इतरांनी अप्रामाणिक कृत्य करून फायदा मिळवण्याचा प्रयत्न केला आहे.”