अभिनेत्रींच्या आयुष्यात कमबॅक हा नेहमीच धाकधुकीचा काळ असतो. एकतर यशाच्या शिखरावर असताना लग्नामुळे अभिनयात ब्रेक येतो तर दुसरीकडे जेव्हा त्या आई होतात त्यानंतर रुपेरी पडद्यापासून त्या दूर राहतात. पण अभिनय तर त्यांना कायमच खुणावत असतो. त्यामुळेच लग्न आणि मातृत्व यासाठी दिलेला वेळ संपल्यानंतर जेव्हा त्यांना अभिनयक्षेत्र खुणावू लागते तेव्हा त्यांच्या कमबॅकविषयी चाहत्यांना उत्सुकता असते. सध्या ही फेज अभिनेत्री अनुष्का शर्मा हिच्या आयुष्यात आली आहे. मुलगी वामिका हिच्या जन्मानंतर अनुष्का सिनेमांपासून लांब होती. आता ती पुन्हा एकदा ऑनक्रिन येणार आहे आणि त्यासाठी तिने पती विराट कोहलीचे क्षेत्र म्हणजे क्रिकेटच्या मैदानावर कमबॅक केले आहे. अर्थात अनुष्का काय या मैदानात चौकार-षटकार मारणार नाही तर गोलंदाज झूलन गोस्वामीच्या बायोपिकमध्ये ती मैदानावर उतरणार आहे. तिच्या कमबॅकबद्दल चाहत्यांनी वेगवेगळय़ा प्रतिक्रिया दिल्या. पण अनुष्कानेही झूलन साकारण्यासाठी बरेच कष्ट घेतले असल्याचे सांगितले आहे.
ती 3 वर्षे बॉलिवूडपासून दूर होती. आता पुन्हा धमाकेदार कमबॅक करत ‘चकदा एक्सप्रेस’चा पहिला लूक प्रेक्षकांच्या भेटीला आला. भारताची माजी महिला कॅप्टन झूलन गोस्वामीच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा आहे. सिनेमाच्या पहिल्या लुकमध्ये अनुष्का शर्मा मैदानावर हातात बॅट घेऊन उभी आहे. अनुष्काला क्रिकेटरच्या भूमिकेत पाहून तिचे चाहते फार खूश झाले आहेत. मात्र ट्रोलर्सच्या देखील निशाण्यावर ती आली आहे.
सिनेमाची पहिली झलक शेअर करत अनुष्काने सोशल मीडियावर एक भली मोठी पोस्ट लिहित झूलन गोस्वामी यांच्या कारकिर्दीवर नजर टाकली आहे. ‘एक महिला म्हणून, झुलनची कथा ऐकून मला अभिमान वाटला, असे अनुष्काने म्हटले आहे. झूलन यांची कथा प्रेक्षकांपर्यंत आणि क्रिकेटप्रेमींपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मी केला आहे. ही माझ्यासाठी फार अभिमानाची गोष्ट आहे. झुलन यांची कथा ही खरोखरच भारतातील क्रिकेटच्या इतिहासातील एक अंडरडॉग कथा आहे’, असे अनुष्काने म्हटले आहे. झूलन यांच्या भूमिकेसाठी अनुष्काला घेतल्याने नेटकऱयांनी अनुष्कावर चांगलाच निशाणा साधलाय. ती कोणत्याही अँगलवरुन झूलन गोस्वामी वाटत नाही. अनुष्काची हाईट, स्किन कलर, बंगाली भाषेवरील प्रभुत्त्व, त्यांच्यासारखा लुक यातील काहीही मिळते जुळते नाही. अनुष्का झूलन यांच्यासारखी अजिबात दिसत नाही, असे म्हणत अनुष्काला ट्रोल केले आहे. निदान झूलन यांचा स्किन कलर तरी अनुष्काशी मॅच करायचा होता, असे म्हटले आहे.
अनुष्काकडून प्रेक्षकांना अनेक अपेक्षा होत्या मात्र सिनेमाच्या पहिल्याच लूकमध्येच अनुष्काने सर्वांना निराश केले आहे. अनुष्का ऐवजी बिपाशा बासु किंवा ईशा गुप्ता या भूमिकेसाठी योग्य वाटल्या असत्या. अशा प्रतिक्रिया प्रेक्षकांकडून येत आहेत.
संकलन – अनुराधा कदम