कणकवली:
करमळी व थिविम स्थानकादरम्यान बोगद्यामध्ये मोठय़ा प्रमाणात पाणी साचल्याच्या घटनेनंतर ‘ट्रक’वरील गाडय़ा विविध ठिकाणी थांबवाव्या लागल्या. तर ‘ट्रक’ सुरळीत होण्यास विलंब लागणार असल्याने अनेक गाडय़ा अन्य मार्गाने वळविण्यात आल्या. थिविम स्थानकाजवळून सुटणाऱया काही गाडय़ा जागीच थांबल्याने त्यातील प्रवाशांना बसद्वारे इतर स्थानकांकडे पोहोचवून त्यांची अन्य ट्रेनमध्ये व्यवस्था करण्यात आली. काही गाडय़ा रद्दही कराव्या लागल्या. मुसळधार पावसामुळे अनेक गाडय़ा विलंबाने धावत होत्या.
अनेक गाडय़ा अन्य मार्गे वळविण्यात आल्या. यात 18 जुलैची हजरत निजामुद्दीन – एर्नाकुलम (02618), एर्नाकुलम – एलटीटी दुरांतो एक्प्रेस, कोचुवेली – पोरबंदर (09261), एर्नाकुलम – अजमेर (02977), एलटीटी थिरुवनंतपूरम (06345) नेत्रावती एक्सप्रेस, कोचुवेली – चंदीगढ (04559), कोईंबटूर – जबलपूर (02197), थिरुवनंतपूरम – लोकमान्य नेत्रावती या गाडय़ा अन्य मार्गाने वळविण्यात आल्या.
प्रवाशांची अन्य ट्रेनमधून व्यवस्था
‘ट्रक’वर सुरू असलेल्या काही गाडय़ा थिविम स्थानकातून येणाऱया/जाणाऱया असल्याने त्यातील प्रवाशांना बसद्वारे अन्य स्थानकावर पोहोचवून पुढे अन्य ट्रेनमधून व्यवस्था करण्यात आली. यात सीएसएमटी-मडगाव कोकणकन्या एक्सप्रेसच्या (1111) प्रवाशांना थिविम येथून मडगाव येथे बसने नेण्यात आले व अन्य रेल्वेची व्यवस्था करण्यात आली. मडगाव-सीएसएमटी मांडवी एक्सप्रेस (01114) थिविम येथून दुपारी 12 वाजता सोडण्यात आली. यातील मडगावच्या प्रवाशांची थिविमपर्यंत बसव्यवस्था करण्यात आली. हजरत निजामुद्दीन-थिरुवनंतपुरम (02432), मडगाव -हजरत निजामुद्दीन (02413), सीएसएमटी-मेंगलोर (01133), एलटीटी- थिरुवनंतपुरम नेत्रावती (06345) या प्रवाशांनाही बसद्वारे अन्य स्थानकावर नेऊन तेथून दुसऱया रेल्वेमध्ये व्यवस्था करण्यात आली. सीएसएमटी-मडगाव जनशताब्दीच्या प्रवाशांनाही थिविमहून मडगावला बसने नेण्यात आले.
स्थानकांमध्ये गाडय़ा थांबविल्या
बोगद्यात पाणी आल्याच्या घटनेमुळे ‘ट्रक’वरील मडगावच्या दिशेने जाणाऱया गाडय़ा ठिकठिकाणच्या स्थानकांमध्ये थांबवाव्या लागल्या. सिंधुदुर्गातही दोन गाडय़ा थांबवाव्या लागल्या होत्या. यात पुणे-एर्नाकुलम सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास सावंतवाडी, तर कोकणकन्या एक्सप्रेस सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास कुडाळ स्थानकात थांबवून ठेवण्यात आली होती.
काही रेल्वेगाडय़ा रद्द
काही रेल्वेगाडय़ा रद्दही कराव्या लागल्या. यात 19 जुलैची मडगाव-सीएसएमटी कोकणकन्या एक्सप्रेस व 20 जुलैची सीएसएमटी-मडगाव मांडवी एक्सप्रेस या गाडय़ांचा समावेश होता. 19 जुलैची मेंगलोर-सीएसएमटी (01134) ही गाडी थिविम ते सीएसएमटी अशी सोडण्यात आली होती. त्यासाठी मडगाव, करमळी येथील प्रवाशांना बसद्वारे थिविम येथे नेण्यात आले.
रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत
सातत्याने कोसळणाऱया पावसामुळे कोकण रेल्वे मार्गावरील सोमवारी दुपारच्या सत्रात सुरू असलेल्या गाडय़ांचा वेग मंदावला होता. यात दादर-सावंतवाडी तुतारी एक्सप्रेस तीन तास, सीएसएमटी-मेंगलोर सहा तास, हजरत निजामुद्दीन-थिरुवनंतपूरम गाडी चार तास, एलटीटी-मेंगलोर मत्स्यगंधा एक्सप्रेस 11 तास, एलटीटी-त्रिवेंद्रम सहा तास, कोचुवेली-पोरबंदर दहा तास विलंबाने धावत होती.