प्रतिनिधी / कोल्हापूर
अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या मित्राचा प्रियकराच्या मदतीने खून केल्या प्रकरणी दोषी ठरवून महिलेस दोघांना जिल्हा व सत्र न्यायाधीश बी. डी. शेळके यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे ऍड. अमित महाडेश्वर यांनी काम पाहिले. संतोष पुंडलिक कापसे (वय 24 रा. वाठार तर्फे वडगांव ता. हातकणंगले), दमयंती राजू यादव (वय 30 रा. इंदिरानगर, इचलकरंजी, हातकणंगले) अशी त्यांची नावे आहेत. 24 जून 2014 रोजी सुशांत मोरे याचा वाठार येथे खून करण्यात आला होता.
याबाबत अधिक माहिती अशी की, सुशांत मोरे याचे वडील दत्ता मोरे यांच्याकडे दमयंती यादव ही गवंडी कामास होती. पतीसोबत वाद झाल्याने ती विभक्त राहत होती. यातून सुशांत व दमयंती यादव यांची ओळख निर्माण झाली. या ओळखीतून त्यांचे प्रेमसंबंध निर्माण झाले. मात्र कालांतराने या दोघांमध्येही वाद निर्माण झाल्याने दमयंती सुशांत पासून वेगळी राहू लागली. यानंतर तीचे सातारा येथे संतोष कापसे याच्याशी प्रेमसंबंध निर्माण झाले. याची माहिती सुशांत मोरे यास समजली. सुशांतने सातारा येथे जावून दमयंतीची भेट घेण्याचे प्रयत्न केले. मात्र तेथे दोघांमध्ये वाद सुरु झाले. संतोष कापसे यानेही सुशांत मोरे यास दमदाटी केली. काही दिवसांनी दमयंती यादव व संतोष कापसे वाठार तर्फे वडगांव येथे भाड्याच्या घरात राहण्यास आले. याची माहिती सुशांतला मिळाली.
24 जुन 2014 रोजी रात्री सुशांत दमयंतीला भेटण्यासाठी घरी गेला. यावेळी दमयंती व संतोषने सुशांतला मारहाण करत घरामध्ये नेले. तेथे त्याच्या डोक्यावर लाकडी बॅटने वार करुन त्याचा खून केला. यानंतर 25 जूनच्या रात्री एैतवडे रोडवर रस्त्याकडेला उसामध्ये फेकून दिला. 26 जुन रोजी हि घटना उघडकीस आली होती.