हुक्केरी तालुक्यातील नरसिंगपूर येथील घटना : संशयित आरोपी फरारी : पोलिसांकडून शोध जारी
प्रतिनिधी / संकेश्वर
आपल्या कुटुंबातील मुलीशी अनैतिक संबंध असल्याच्या संतापापोटी दोघाजणांनी युवकाचा पाठलाग करून त्याचा निर्घृण खून केला. ही घटना नरसिंगपूर (ता. हुक्केरी) येथे 1 रोजी रात्री उघडकीस आली आहे. बिराप्पा विठ्ठल कमती (वय 27 रा. नरसिंगपूर) असे मृताचे नाव आहे. तर बिराप्पा दुंडाप्पा बडाई व सत्याप्पा सिद्धाप्पा बडाई (रा. नरसिंगपूर) अशी संशयित आरोपींची नावे आहेत.
या घटनेबाबत समजलेली माहिती अशी, संशयित आरोपींच्या कुटुंबातील मुलीशी मृत बिराप्पा कमती याचे गेल्या काही वर्षापासून अनैतिक संबंध होते. ही माहिती मुलीच्या घरी समजताच त्यांनी बिराप्पाला काही दिवसांपासून समजावण्याचा प्रयत्न केला, पण त्याने न ऐकल्याने संतापलेल्या बिराप्पा बडाई व सत्याप्पा बडाई यांनी बुधवारी रात्री त्याचा पाठलाग करत स्मशानभूमीत त्याला गाठले. त्यानंतर त्यांनी बिराप्पाच्या मानेवर व डोक्यावर विळय़ाने वार केल्याने तो जागीच ठार झाला.
घटनेची फिर्याद भिमराव पुंडलिक हेगडे (रा. मुस्लीम गल्ली, काकती) यांनी दिली आहे. या घटनेची माहिती मिळताच यमकनमर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रमेश पाटील यांनी आपल्या पोलीस फौजफाटय़ासह घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला. विच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.
घटनेनंतर संशयित आरोपी फरार झाले आहेत. पोलिसांनी त्यांचा शोध चालविला असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक रमेश पाटील यांनी दिली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.