प्रियकराच्या मदतीने पत्नीने पतीचा गळा आवळला : सौंदत्ती तालुक्यातील घटना
वार्ताहर /बाळेकुंद्री
अनैतिक संबंधात पती अडसर ठरत असल्याने पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केल्याची घटना सौंदत्ती तालुक्यातील मुगलीहाळ गावात रविवारी उघडकीस आल्याने गावात खबबळ माजली आहे.
लक्ष्मण तिप्पण्णा मुंजी (वय 38) असे खून झालेल्या पतीचे नाव आहे. तर पत्नी उद्धव्वा लक्ष्मण मुंजी (वय 32) आणि तिचा मेळीकेरी गावचा प्रियकर अर्जुन अरेरा असे खून केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. या घटनेनंतर दोघेही फरारी झाले असून त्यांचा कसून तपास मुरगोड पोलीस करत आहेत. प्रेमात वरचेवर आड येणाऱया पतीलाच पत्नीने आपल्या प्रियकराला शेतातील घरातच बुधवारी बोलावून घेऊन पतीचा दोरीने गळा आवळून खून केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
याविषयी मुरगोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उद्धवा व तिचा प्रियकर अर्जून या दोघांचे अनैतिक संबंध होते. परंतु या संबंधावर पती लक्ष्मण हा आड येत असल्याचे उद्धवा वरचेवर आपल्या प्रियकराला सांगत असे. यावेळी दोघेही प्रेमात अडसर ठरलेल्या लक्ष्मण मुंजी याचा खून करण्याच्या उद्देशाने पत्नी उद्धवाने तिचा प्रियकर अर्जुन याला फोनद्धारे बुधवारी आपल्या घरी बोलावून घेतले.
आणि दोघेही मिळून पती लक्ष्मण याच्या गळय़ाला दोरी आवळून त्याचा खून केला. खुनाची वाच्यता होऊ नये म्हणून लक्ष्मणचा मृतदेह दुचाकीवरून नेऊन घटप्रभाच्या उजव्या कालव्यात फेकून देण्यात आला. आणि मोटारसायकलला अपघात झाल्याचे भासविण्याचा प्रयत्न केला. या घटनेसंबंधी मयत लक्ष्मणचा मोठा भाऊ बाळाप्पा मुंजी याने मुरगोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. घटनास्थळी डीवायएसपी रामनगौड हट्टी, सौंदत्ती पोलीस ठाण्याचे सीपीआय मंजुनाथ नडविनमनी व पीएसआय प्रवीण गंगोली यांनी भेट देऊन पाहणी केली. मुरगोड पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.