प्रियकरासह दोघा जणांना अटक, हुबळी रेल्वे पोलिसांची कारवाई
प्रतिनिधी / बेळगाव
अनैतिक संबंधात अडसर ठरलेल्या पतीचा प्रियकराच्या मदतीने खून करून त्याचा मृतदेह रेल्वे रूळावर टाकून देणाऱ्या महिलेसह दोघा जणांना अटक करण्यात आली आहे. हुबळी येथील रेल्वे पोलीस विभागाचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची व त्यांच्या सहकाऱयांनी या खून प्रकरणाचा छडा लावला आहे.
शोभा चंद्राप्पा लमाणी (वय 38) राहणार श्रीनिवासपूर, गंगाजल तांडा, ता. राणेबेन्नूर, जि. हावेरी, दिळय़ाप्पा यमनाप्पा अंतरवळ्ळी (वय 48) रा. राणेबेन्नूर अशी अटक करण्यात आलेल्या दोघा जणांची नावे आहेत. शुक्रवारी 9 ऑक्टोबर रोजी या जोडगोळीला अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे.
रेल्वे विभागाच्या पोलीस उपअधीक्षक पुष्पलता यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची, पोलीस उपनिरीक्षक सत्याप्पा एम., बी. एन. रामनगौडर, एफ. जी. पुल्ली, एस. बी. पाटील, प्रवीण पाटील, रवि वाल्मिकी, आर. एच. गुळेद, व्ही. मंजुनाथ, सुरेश गणाचारी, शिवरेड्डी मोरब, रमेश लमाणी, सुभाष दळवाई, रायाप्पा गुंडगी, तिप्पेस्वामी, राचोटप्पा बिरादार, दाक्षायणी गुंडीनमनी, जन्नतबी शेख सनदी व श्रृती भीमनगौडर आदींनी ही कारवाई केली आहे.
मे 2020 मध्ये राणेबेन्नूर रेल्वेस्थानकाजवळ चंद्राप्पा लमाणी (वय 40) रा. श्रीनिवासपूर, गंगाजल तांडा या मजुराचा मृतदेह रेल्वेरूळावर आढळून आला होता. सुरुवातीला या मजुराने आत्महत्या केली असेल का? असा संशय बळावला होता. मात्र, पोलीस तपासाअंती खून करून पुरावे नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह रेल्वेरूळावर टाकल्याचे उघडकीस आले होते. पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला आहे. खून झालेल्या चंद्राप्पाची पत्नी शोभा हिने आपल्या प्रियकराच्या मदतीने त्याचा काटा काढल्याचे तपासात उघडकीस आले आहे. शोभा व दिळय़ाप्पा यांच्यात अनैतिक संबंध होते. मोलमजुरीसाठी चंद्राप्पा दोन-तीन महिने परगावी असायचा. लॉकडाऊनच्या काळात काम नसल्यामुळे तो घरीच होता. त्यामुळे शोभा आणि दिळय़ाप्पा यांच्या अनैतिक संबंधात अडसर निर्माण झाला होता. म्हणून या दोघा जणांनी रेल्वेरूळा शेजारच्या शेतात चंद्राप्पाला बोलावून त्याचा गळा आवळून खून केला. पुरावे नष्ट करण्यासाठी रेल्वेरूळावर त्याचा मृतदेह फेकल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणात एका अल्पवयीन मुलाचाही सहभाग असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले