महाभारतात गांधारीने डोळ्यांवर पट्टी बांधून घेतली होती. आधुनिक काळात रमा शाह यांनी डोळ्यांवर पट्टी बांधली आहे. मुंबईच्या रमा डोळे झाकून सुबक आणि सुंदर गणेशमूर्ती घडवतात. त्यांच्या गणेशमूर्ती विविध ठिकाणी पाठवल्या जातात. रमा यांचं नाव गिनिज बुकमध्येही नोंदवण्यात आलं आहे.
श्री गणेशाच्या सुबक आणि सुंदर मूर्ती भक्तांना आकर्षित करतात. या मूर्तींमागे मूर्तीकारांची मेहनत आणि कष्ट असतात. अनेक रात्री जागवल्यानंतर मनाजोगती मूर्ती घडते. रमा शहाही गणपती बाप्पाच्या सुंदर मूर्ती साकारतात. पण त्या डोळ्यांवर पट्टी बांधून मूर्ती तयार करतात. हा गुण त्यांनी आत्मसात केला आहे. मागील 20 वर्षांपासून त्या अशा पद्धतीने मूर्ती साकारत आहेत. या गुणवैशिष्टय़ामुळे रमा यांचं नाव गिनिज बुक आणि लिम्का बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये नोंदवण्यात आलं आहे. गणपतीची मूर्ती घडवायला बराच काळ लागतो. मात्र रमा यांनी फक्त तीन मिनिटांमध्ये विद्येच्या या देवतेची छोटय़ा आकाराची मूर्ती घडवली आहे. यानंतर त्यांचं नाव गिनिज बुकमध्ये नोंदवलं गेलं. इतकंच नाही तर रिप्ले बिलिव्ह इट ऑर नॉट या अमेरिकन कार्यक्रमातही त्या सहभागी झाल्या होत्या. रमा यांनी 24 तासांत दिवसांमध्ये डोळ्यांवर पट्टी बांधून गणपतीच्या 999 मूर्ती घडवल्या. त्यांनी अठरा हजारांपेक्षा अधिक मूतvचं प्रदर्शनही भरवलं होतं. हा सुद्धा एक विक्रमच आहे.
रमा या गृहिणी असून मुलांना चित्रकला आणि हस्तकला शिकवतात. त्यांना मूर्ती घडवण्याचा छंद असून ही आवड जोपासण्यासाठीच त्या गणेशाच्या मूर्ती घडवतात. गेल्या 20 वर्षांमध्ये त्यांनी विविध आकारांच्या 3,78,000 पेक्षा अधिक गणेशमूर्ती साकारल्या आहेत. त्यांनी या मूर्ती विविध क्षेत्रातल्या मान्यवरांना भेट दिल्या आहेत. त्यांच्या कलेचं सर्वच स्तरातून कौतुक होत असतं.
रमा यांनी 2004 मध्ये भावनगर शहरात डोळ्यांवर पट्टी बांधून अत्यंत सुबक अशी गणेशमूर्ती घडवली. ही गणेशमूर्ती त्यांनी त्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री असणार्या नरेंद्र मोदी यांना भेट दिली होती. ‘रमाज गणेशा डॉट कॉम’ ही त्यांची वेबसाईटही आहे. रमा विविध सामाजिक तसंच सांस्कृतिक संस्थांच्या सदस्य आहेत. रमा यांच्या यशात त्यांच्या पतीचाही महत्त्वाचा वाटा आहे.