रसद जमविण्यासाठी तालिबानींकडून लोकांना मारहाण अन् लूट
अफगाणिस्तानची राजधानी काबूलवरील तालिबानच्या कब्जाला आठवडा उलटला आहे. यादरम्यान काबूलपासुन कुंदुज आणि कंधारपर्यंत तालिबान्यांकडून होणारी मारहाण, अपमान, क्रूर अत्याचारांवरून लोकांमध्ये दहशत आहे. तालिबानने सुमारे 25 हून अधिक प्रांतांच्या राजधान्यांवर कब्जा केला आहे, पण त्याच्याकडे दहशतवाद्यांच्या खाण्यापिण्यापासून इंधनसारखी रसद पोहोचविण्याची कुठलीच व्यवस्था नाही.
याच कमतरतेमुळे सर्वसामान्य लोकांना यातना सहन कराव्या लागत आहेत. लोकांना घाबरवून-धमकावून तसेच लूट करत दहशतवादी अन्न आणि डिझेल-पेट्रोलची व्यवस्था करण्यास भाग पाडत आहेत. भीतीमुळे कार्यालयेही बंद आहेत. कार्यालयांमध्ये वेतनाशिवाय काम करण्यासाठी परता अन्यथा परिणाम भोगावे लागतील अशी धमकी तालिबानकडून देण्यात येत आहे.
सार्वजनिक मालमत्तेची लूट
दहशतवाद्यांनी महिलांच्या दागिन्यांसोबत कोटय़वधी रुपयांची वैयक्तिक तसेच सार्वजनिक मालमत्ता लुटली आहे. कंधारमध्ये तालिबानी दहशतवाद्यांनी खंडणीच्या नावाखाली वाहनेच पळविली आहेत. खंडणीसाठी कंधार, गजनी, हेलमंड आणि काबूलमध्ये शेकडो लोकांचे अपहरण करत त्यांची हत्या करण्यात आली आहे. एका मुलाचे दहशतवाद्यांनी अपहरण केले होते, त्याची आई स्वतःच्या मुलाच्या सुटकेसाठी आता तालिबानी दहशतवाद्यांसमोर विनवणी करत आहे.
..म्हणून पेटवून दिले
अफगाणी महिलांवर अत्यंत वाईट वेळ आली आहे. तालिबानी दहशतवादी महिलांचे अपहरण करून त्यांच्याकडून घरगुती कामे करवून घेण्यासह शारीरिक शोषणही करत आहेत. रुचकर स्वयंपाक न करणाऱया महिलांना पेटवून देण्यासही दहशतवादी मागेपुढे पाहत नाहीत. आगीत होरपळल्याने अनेक महिलांचा मृत्यू झाला आहे.