अंमलबजावणी संचालनालयाची कारवाई : 17.66 कोटींची मालमत्ता असल्याचा अंदाज
प्रतिनिधी / बेंगळूर
महिलांचे हक्क, बालहक्क, मानसिक छळावर प्रतिबंध, मृत्यूदंडाची शिक्षा रद्द करणे, निराश्रीतांच्या हक्कांचे संरक्षण, कैद्यांच्या हक्कांचे रक्षण आदी मागण्यांसाठी काम करणाऱया अम्नेस्टी इंटरनॅशनल इंडिया संस्थेची बेंगळूरमधील स्थावर मालमत्ता अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बुधवारी जप्त केली आहे.
बेंगळूरमधील कार्यालयातील जप्त केलेल्या मालमत्तेचे मूल्य 17.66 कोटी रुपये इतके असल्याचा अंदाज आहे. विदेशी विनियम कायद्याचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली आहे. एफसीआरए नियमांचे उल्लंघन करून आर्थिक व्यवहार केल्याचा आरो अम्नेस्टी इंटरनॅशनल संस्थेवर आहे. 2019 मध्ये सीबीआयने देखील याच कारणावरून या संस्थेच्या बेंगळूर आणि दिल्लीतील कार्यालयांवर ईडीने छापे टाकले होते. त्यानंतर भारतातील सर्व शाखांच्या बँक खाती गोठविण्यात आल्या
होत्या.
नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोप अन्मेस्टी इंटरनॅशनल इंडिया एक खासगी स्वयंसेवा संस्था आहे. मानव हक्कांच्या रक्षणासाठी ही संस्था आंदोलन करते. मानव हक्कांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करते. जगभरातील विविध देशांमध्ये या संस्थेचे 7 दशलक्ष सदस्य आहेत. 1961 मध्ये लंडनमध्ये पीटर बेनेसन यांनी ही संस्था सुरू केली. 1977 मध्ये छळाविरुद्ध केलेल्या आंदोलनाची दखल घेऊन या संस्थेला शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला होता. मात्र, विदेशातून येणारा निधी आणि विदेशी विनिमय नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून या संस्थेची बेंगळूरमधील मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.