जिम, ब्यूटी पार्लर 50 टक्के क्षमतेने सुरू ठेवण्यास परवानगी
जालना / प्रतिनिधी
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जालन्यात पत्रकारांशी बोलताना सूचक वक्तव्य केले आहे. त्यामध्ये गर्दी होत असेल तर दारूची दुकाने, धार्मिक स्थळेही बंद करावी लागतील, असा इशाराही त्यांनी दिला.
डिसेंबरपासून कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे कोरोना बरोबरच नवीन व्हेरियंट असलेला ओमिक्रॉनचे रूग्ण वाढत असून त्यामुळे सार्वजनिक स्थळावरील गर्दी नियंत्रणात असणे गरजेचे आहे. ऑक्सिजनची मागणी वाढून हॉस्पिटलमध्ये बेड कमी पडत नाहीत तोपर्यंत आणखी नवे निर्बंध लावले जाणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले. कोव्हीडचा धोका पाहता शाळा बंद ठेवल्या असल्या तरी दारूची दुकाने सुरूच आहेत त्यामुळे विरोधक टीका करत आहेत. त्यामुळे गर्दी होत असेल तर दारूची दुकानेही बंद करू असा इशारा आरोग्यमंत्रांनी दिला.
राज्य सरकारने शनिवारी जाहीर केलेल्या सुधारित नियमावलीत ब्यूटी पार्लर आणि व्यायामशाळा बंदचा निर्णय घेतला असला तरीही हेअर सलूनला ५०% क्षमतेने परवानगी दिली आहे त्यामुळे ब्यूटी पार्लर, जिम बंदच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीका सुरू झाली होती. त्यानंतर शासनाने रविवारी सुधारित नियमावली जारी केली.
सुधारित नियमावलीप्रमाणे या ब्यूटी पार्लरमध्ये तोंडावरील मास्क न काढता करण्यात येणाऱ्या सेवांना परवानगी असून लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच या सेवा पुरवल्या जातील. तसेच सलून कर्मचाऱ्यांचे लसीचे दोन्ही डोस पूर्ण होणे गरजेचे असल्याचे सरकारी आदेशात म्हटले आहे. याबरोबरच जिमही ५० टक्के क्षमतेने सुरू राहणार असून कोणताही व्यायाम करताना मास्क काढता येणार नाही. तसेच संपूर्ण लसीकरण झालेल्यांनाच जिम करण्याची परवानगी आहे. जिममधील कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झालेले असावे ही अटही सुधारित आदेशात घातली आहे.