डिचोली/प्रतिनिधी
डिचोलीतील सेसा वेदांत कंपनीने कामगारांच्या 15 महिन्यांच्या पगाराचा विषय तातडीने न सोडविल्यास कंपनीविरूध्द आम्हाला आंदोलन छेडावे लागणार, असा इशारा कामगार संघटनेचे अध्यक्ष निलेश कारबोटकर यांनी पत्रकार परिषदेतून दिला आहे.
या पत्रकार परिषदेला किशोर लोकरे, राजेश गावकर, नारायण गावकर, इंद्रकांत फाळकर, बाबुसो कारबोटकर, महेश होबळे, अनिल सालेलकर, पांडुरंग परब, आमें व इतर कामगारांची उपस्थिती होती.
कामगारांच्या पगाराबाबत यापूर्वी दोन वेळा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची कामगारांनी भेट घेतली होती. मुख्यमंत्र्यांनी याविषयी लक्ष घालण्याचे आश्वासनही दिलेल्या होते. मात्र या विषयावर कोणत्याही हालचाली झालेल्या नसल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. आज कंपनी कामगारांच्या प्रती बेफिकीरपणे लागत आहे. कामगारांना दुय्यम वागणूक देऊन छळ करीत आहे. अशी टिका निलेश कारबोटकर यांनी केली.
कंपनीच्या खाणीतील डंप किंवा रॉयल्टी भरलेला माल उचलताना कंपनीने कामगांचा वापर करीत त्यांना पूर्ण पगार दिला. मात्र त्यानंतर कामगारांना आता अर्ध्याच पगारावर ठेवले आहे. कंपनीकडून कामगारांचा 15 महिन्यांचा पगार देणे बाकी असून सध्या गणेश चतुर्थीचा सण तोंडावर आहे. हातात येणाऱया अल्प अशा पगारात हा सण कसा काय साजरा करावा ? सरकारनेही कामगारांची घोर निराशा केली असून कंपनीकडून कामगारांचे हित जपण्यासाठी सरकार कंपनीवर दबाव आणू शकत नाही, हि दुर्दैवी बाब आहे. अन्यथा सरकारने तरी कामगारांना आर्थिक सहाय्य करावे, अशी मागणी निलेश कारबोटकर व किशोर लोकरे यांनी केली.