प्रतिनिधी / इचलकरंजी
शहरातील सलून व पानपट्टी दुकाने सुरू करण्याची परवानगी द्यावी, तसेच व्यावसायिकांना माणसी १० हजार रुपये अनुदान द्यावे अशा मागणीचे निवेदन येथील भारतीय जनता पक्षाच्यावतीने प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांना देण्यात आले.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन घोषित करून सर्व व्यवसाय, व्यापार व उद्योग बंद करण्यात आले होते. अडीच महिन्यांनंतर हळूहळू व्यवसाय व उद्योगांना अटी शर्तींवर सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली. मात्र अद्यापही सलून व पानपट्टी व्यवसाय पूर्णपणे बंद आहेत. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या या व्यावसायिकांना अनेक संकटातून जावे लागत आहे. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
त्यामुळे सलून व पानपट्टी दुकाने सुरू करण्यास परवानगी द्यावी, अन्यथा मागील ३ महिन्यांसाठी त्यांना माणसी १० हजार रुपये अनुदान मिळावे, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी शहराध्यक्ष अनिल डाळ्या, प्रवक्ते रामदास कोळी, युवा मोर्चाचे अध्यक्ष प्रवीण पाटील, कोंडीबा दवडते, प्रदीप मळगे यांचेसह पदाधिकारी उपस्थित होते.