वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय फुटबॉलपटू अन्वर अली याला हृदयविकाराची व्याधी झाली असून त्याला फुटबॉलचा सराव तातडीने थांबविण्याचा आदेश देण्यात आला आहे. गेल्या काही महिन्यापासून हृदयविकार संदर्भातची व्याधी त्याला झाल्याचे वैद्यकीय तपासणीमध्ये आढळून आले होते. आता अन्वर अलीचा वैद्यकीय अहवाल आशियाई फुटबॉल कॉन्फेडरेशनकडे (एएफसी) पाठविण्यात आला आहे. या व्याधीमुळे अन्वर अलीच्या फुटबॉल कारकीर्दीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 2017 साली झालेल्या फिफाच्या 17 वर्षांखालील वयोगटाच्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत अन्वर अलीने चमकदार कामगिरी केली होती. गेल्या आठवडय़ात कोलकाता येथे एका खासगी रूग्णालयात अन्वर अलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यावेळी रक्त तपासणी, सीटी स्कॅन आणि एमआरआय करण्यात आले. या सर्व वैद्यकीय तपासणीचे अहवाल अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनच्या वैद्यकीय समितीकडे पाठविण्यात आले आहेत. आता हे वैद्यकीय अहवाल एएफसीकडे पाठविण्यात आले असून अन्वर अली संदर्भात अंतिम निर्णय लवकरच घेतला जाईल