2.25 कोटी दंड – पटियाला हाऊस कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पटियाला हाऊस न्यायालयाने सोमवारी दिल्लीतील उपहार सिनेमा आगप्रकरणी निकाल दिला. पुराव्यांशी छेडछाड केल्याप्रकरणी न्यायालयाने मुख्य आरोपी सुनील अन्सल आणि गोपाल अन्सल यांच्यासह अन्य दोन दोषींना 7-7 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच न्यायालयाने दोषींना 2.25 कोटी रुपये इतका दंडही ठोठावला आहे. अन्सल बंधूंवर पुराव्यांशी छेडछाड केल्याचा ठपका ठेवत न्यायालयाकडून कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
पटियाला हाऊस न्यायालयाने उपहार सिनेमा आग प्रकरणात 8 ऑक्टोबर रोजी पुराव्यांशी छेडछाड केल्याप्रकरणी सुशील आणि गोपाल अन्सल बंधूंसह पाच जणांना दोषी ठरवले होते. या प्रकरणात न्यायालयाने अन्सल बंधूंसह न्यायालयाचे माजी कर्मचारी दिनेशचंद शर्मा, पीपी बत्रा आणि अनूप सिंग यांनाही दोषी ठरवले होते. या प्रकरणात, दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एक एफआयआर नोंदवण्यात आला होता, ज्यामध्ये आयपीसीच्या कलम 120-बी, 109, 201 आणि 409 अंतर्गत गुन्हा केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला होता.
13 जून 1997 रोजी दिल्लीतील ग्रीन पार्क येथील उपहार टॉकीजला आग लागली होती. या घटनेत 59 जणांचा मृत्यू झाला होता. 100 हून अधिक लोक जखमी झाले होते. त्या दिवशी ‘बॉर्डर’ हा चित्रपट टॉकीजमध्ये लावण्यात आला होता. चित्रपटादरम्यानच चित्रपटगृहाच्या ट्रान्सफॉर्मरला आग लागल्यानंतर इतर भागातही पसरली. टॉकीजमध्ये कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसल्याचे तपासात समोर आले होते. या खटल्याच्या सुनावणीदरम्यान अन्सल बंधूंवर याचिकाकर्त्यांना धमकावून न्यायालयीन कागदपत्रांची छेडछाड केल्याचा आणि न्यायालयीन कर्मचाऱयांशी हातमिळवणी केल्याचा आरोप होता. तपासादरम्यान फाईल्समधून पाने फाडून गायब करण्यात आली होती.