ऑनलाईन टीम / मुंबई :
ॲमेझॉन या संकेतस्थळावरून तीनशे रुपयांच्या बॉडी लोशनची मागणी केलेल्या एका ग्राहकाला चक्क 19 हजार रुपयांचे बोस कंपनीचे हेडफोन्स देण्यात आले. विशेष म्हणजे त्यानंतर या व्यक्तीने देवाणघेवाणीसाठी ॲमेझॉनच्या कस्टमर केअरशी संपर्क साधला असता कंपनीकडून हे हेडफोन्स नॉन रिटर्ननेबल आहेत, त्यामुळे ते तुमच्याकडेच ठेवून द्या, असे सांगण्यात आले.
हा प्रकार घडलाय जोश सॉफ्टवेअरचे सह-संस्थापक आणि दिग्दर्शक गौतम रेगे यांच्या बाबतीत. त्यांनी ट्विटरवरून याबाबतची माहिती दिली आहे. रेेगे यांच्या या ट्विटवरून लोक आश्चर्यचकित झाले. अनेकांनी रेगे यांना याबाबतची विचारणा केली. एकाने विचारले, ‘ अमेझॉनकडे अजून बॉडी लोशनचा साठा शिल्लक आहे का?, असेल तर लिंक पाठवा.’
तर दुसऱ्या एकाने ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘हॅलो, मला बोस हेडफोनच्या जागी चुकून बॉडी लोशन मिळाले. कृपया देवाणघेवाण करा.’