पालकांना घडवली विमानाची सैर, नीरजसमोर आता 2022 आशियाई, राष्ट्रकुल स्पर्धेचे लक्ष्य
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
ऑलिम्पिक सुवर्ण जेता नीरज चोप्राने शनिवारी आपल्या पालकांना विमानाची पहिलीवहिली सैर घडवून आणली आणि यानंतर आपले महत्त्वाकांक्षी स्वप्न साकार झाले असल्याची भावना व्यक्त केली.
‘मी माझ्या आई-वडिलांना आज पहिलीच विमानाची सैर घडवून आणली. त्यांचा हा पहिला विमानप्रवास होता. खऱया अर्थाने माझे प्रदीर्घ कालावधीपासूनचे स्वप्न आज प्रत्यक्षात साकारले गेले’, असे नीरज याप्रसंगी म्हणाला.
मागील महिन्यात टोकियोत भालाफेकीचे सुवर्ण जिंकल्यानंतर नीरजने आपण आता काही काळ विश्रांती घेणार असल्याचे जाहीर केले होते. यापुढे 2022 आशियाई व राष्ट्रकुल स्पर्धेसाठी तयारीला सुरुवात करणार असल्याचेही तो आवर्जून म्हणाला होता.
शनिवारी त्याने माध्यमांना संबोधित केले आणि सर्वांचे पुन्हा एकदा आभारही मानले. तो म्हणाला, ‘टोकियोहून परतल्यानंतर माझे शानदार स्वागत केल्याबद्दल आणि सातत्याने शुभेच्छांचा वर्षाव केल्याबद्दल मी सर्वांचा मनापासून आभारी आहे. अगदी देशभरातून माझे अभिनंदन झाले. या सर्वांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शब्दही अपुरे पडत आहेत’.
टोकियोतून परतल्यानंतर काही दिवस मी आजारी होतो आणि त्यानंतर लगेच सरावाला सुरुवात करणे शक्य नव्हते. त्यामुळे, काही दिवस विश्रांतीचा निर्णय घेणे भाग होते. 2022 कॅलेंडर वर्षात वर्ल्ड चॅम्पियनशिप, आशियाई स्पर्धा आणि राष्ट्रकुल स्पर्धा होत असून त्या दृष्टीने मी आता तयारी सुरु करेन’, याचा त्याने पुढे उल्लेख केला.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरजने पहिल्या प्रयत्नात 87.02 मीटर्सची फेक केली. मात्र, दुसऱया प्रयत्नात त्यापेक्षा सरस कामगिरी साकारत त्याने 87.58 मीटर्सचा उच्चांक गाठला आणि हाच मार्क त्याला सुवर्ण जिंकून देण्यासाठी पुरेसा ठरला होता.