फाटक गंजल्यामुळे कोसळल्याची माहिती
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव येथील टिळकवाडी भागात असणाऱया दुसऱया रेल्वे गेट कोसळल्यामुळे एकच गोंधळ माजला. रेल्वे गेट कलंडल्याची ही दुसरी घटना असली तरी सुदैवाने यात कोणालाही इजा पोहोचली नाही. फाटक गंजल्यामुळे कलंडला असावा, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. शनिवारी सायंकाळी 7 वाजता ही घटना घडली आहे.
बेळगाव रेल्वेगेट कलंडल्याचे प्रकार सुरूच आहेत. दि. 12 ऑक्टोबर रोजी अशीच घटना घडली होती. आता पुन्हा शनिवारी रेल्वेफाटक वाकल्याचा प्रकार घडला आहे. या ठिकाणी तुरळक वाहतूक असल्याने कोणतीही दुर्दैवी घटना घडली नाही. मात्र याकडे रेल्वे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देवून रेल्वे फाटक दुरुस्त करण्याची मागणी होत आहे.
एक महिन्याआधीच फाटक कलंडल्याची घटना घडली असताना शनिवारी पुन्हा असाच प्रकार घडल्याने रेल्वे प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे यापुढे तरी रेल्वे फाटक सुस्थितीत आहेत का? याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. रेल्वे फाटक कलंडल्याने वाहतूकीची कोंडी झाली होती. त्यानंतर रहदारी पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. रेल्वेच्या अधिकाऱयांनी पहिला, दुसरा व तिसऱया रेल्वे गेटची पाहणी करुन फाटकांची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.