प्रतिनिधी/ पणजी
राज्य सरकारने अपघातग्रस्त व्यक्तींच्या 59 कुटुंबांना प्रत्येकी रु. 2 लाखाची नुकसान भरपाई वितरीत केल्याची माहिती वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी दिली. डिजिटल टॅक्सी मीटर बसवण्यासाठी आणखी यापुढे कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नसल्याचे स्पष्ट करुन ते न बसवल्यास टॅक्सीचे परवाने रद्द होतील, असा इशारा त्यांनी पुन्हा एकदा दिला आहे.
पर्वरी येथील मंत्रालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, गोवा राज्य अंतरिम नुकसान भरपाई योजनेतून ती मदत देण्यात आली आहे. एखाद्या कुटुंबातील सदस्य अपघातात बळी पडल्यास त्या कुटुंबास रु. 2 लाख देण्याची तरतूद सदर योजनेत आहे. त्यानुसार सदर आर्थिक भरपाई संबंधित कुटुंबांना मिळाली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची मुदत एका वर्षासाठी वाढवण्यात आली असून ज्यांना मदत मिळाली नसेल त्यांनी अर्ज करावेत, असे गुदिन्हो यांनी नमूद केले.
वाहतूक खात्याच्या 16 सेवा ऑनलाईन
विविध कामे – सेवांसाठी वाहतूक कार्यालयात हेलपाटे मारावे लागू नयेत म्हणून त्यांनी 16 सेवा ऑनलाईन केल्या आहेत. त्यामुळे लोकांना आता सरकारी सेवांकरीता वाहतूक कार्यालयात येण्याची गरज नाही. ते घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने सेवा प्राप्त करु शकतात, असेही गुदिन्हो म्हणाले.
टॅक्सी मीटर बसवण्यासाठी मुदतवाढ नाही
टॅक्सींना डिजिटल मीटर बसवण्यासाठी उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने खडे बोल सुनावले असून त्याबाबत कडक शब्दात निर्देश दिले आहेत. त्यामुळे टॅक्सी चालकांना आणखी मुदतवाढ देणे आता शक्य नाही. यापूर्वी तीन मुदतवाढी देण्यात आल्या आहेत. त्या देऊनही मीटरसाठी टॅक्सीवाले पुढे येत नाहीत. न्यायालयाच्या निर्देशानुसार मीटर बसवणे आता टॅक्सीना बंधनकारक आहे. आणखी मुदतवाढ दिली तर न्यायालयाचा अवमान होऊ शकतो, असेही ते म्हणाले. नवीन मोटर वाहन कायदा लागू करण्याबाबतची फाईल मंत्रिमंडळ बैठकीसमोर पुन्हा एकदा येणार असून त्यावर निर्णय होऊ शकतो, असे सुतोवाच त्यांनी केले.