वार्ताहर / शिरगाव
कागल एमआयडीसीतून परत येताना झालेल्या अपघातात जखमी झालेल्या येथील युवकाचे कोल्हापूरात उपचार घेताना निधन झाले.
याबाबतची अधिक माहिती अशी , येथील धनाजी शिवाजी किरूळकर (वय ४०) हे कागल एमआयडीसीमध्ये डिझाइन सुपरवायझर म्हणून घाटगे पाटील कंपनीमध्ये काम करीत होते. मंगळवारी चार नंतर काम संपवून ते आपल्या मोटारसायकलवरून येण्यास निघाले.
दरम्यान वाटेत पिंपळगाव फाटा येथे मोटरसायकलच्या आडवे कुत्रे आल्याने त्यांचा ताबा सुटून ते मोटरसायकल वरून खाली पडले. त्यांना गंभीर जखमी अवस्थेत त्यांच्या मित्रानी कोल्हापूरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू होते.
गेले तीन चार दिवस ते उपचाराला साथ देत होते. पण आज पहाटे अचानक त्यांची तब्बेत खालावली होती. डॉक्टरांनी वाचवण्यासाठी निकराचे प्रयत्न केले पण काही उपयोग झाला नाही. सकाळी त्यांचे निधन झाले.
त्यांच्या पश्चात आई , वडिल, भाऊ , भावजय ,बहिणी, पत्नी, दोन मुले, चुलते,चुलतभाऊ असा परिवार आहे. दै.तरुण भारतचे पत्रकार मधुकर किरूळकर यांचे ते भाऊ व सुभाष सेवा संस्थेचे संचालक शिवाजी किरूळकर यांचे ते चिरंजीव होत. रक्षाविसर्जन आज सोमवारी सकाळी नऊ वाजता शिरगाव येथे आहे.