पाचवे अतिरिक्त जिल्हासत्र न्यायालयाचा निकाल
प्रतिनिधी/ बेळगाव
ट्रकने दुचाकीस्वाराला धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला होता. फोंडा-गोवा येथे ही घटना घडली होती. या घटनेतील मयताच्या कुटुंबाला 1 कोटी 60 लाख रुपये देण्याचा आदेश येथील पाचवे अतिरिकत जिल्हासत्र न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत आर. तावरे यांनी दिले आहेत.
विठ्ठल दुर्गादास करंजवाडकर (वय 39, रा. तावडे गल्ली, अक्कोळ, ता. चिकोडी) असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तो दि. 12 जून 2016 रोजी फोंडा-गोवाकडे दुचाकी जीए 05 ई 9501 यावरून जात असताना पाठीमागून येणारा ट्रक क्रमांक एमएच 50/4747 याने ठोकरले. यामध्ये विठ्ठल यांच्या डोक्मयाला गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
विठ्ठल हा गोव्यातील एका खासगी कंपनीमध्ये कामाला होता. त्या ठिकाणी त्याला 1 लाख 35 हजार रुपये वेतन होते. विठ्ठल याचा अपघात झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर मोठा आघात झाला. त्यांनी येथील पाचवे अतिरिक्त जिल्हासत्र न्यायालयात दावा दाखल केला. न्यायाधीशांनी सर्व बाजू ऐकून घेवून विमा कंपनीला 1 कोटी 30 लाख रुपये सहा टक्के व्याजासह देण्याचे आदेश दिले आहेत. इतकी मोठी रक्कम बेळगाव न्यायालयामध्ये पहिल्यांदाच देण्याचे आदेश दिले आहेत. ट्रक चालकाचा परवाना नव्हता. त्यामुळे विमा कंपनीने त्यावर आपली हरकत नोंदविली. मात्र न्यायाधीशांनी प्रथम संबंधित कुटुंबाला रक्कम द्या, त्यानंतर ट्रक मालकाकडून ती रक्कम वसुल करा, असा आदेश देखील दिला आहे. या खटल्यात फिर्यादीच्यावतीने ऍड. क्ही. एम. अंगडी यांनी काम पाहिले.