प्रतिनिधी / कुडचडे
स्वयंअपघातात जखमी झालेले काकोडा येथील कदंब महामंडळाचे कर्मचारी सुहास शिवराम खांडेपारकर (वय 52 वर्षे) यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पार्थिवावर वाडे-कुर्डीत अंत्यसंस्कार करण्यात आले. सदर अपघाताची घटना 9 रोजी घडली होती.
सविस्तर माहितीनुसार, खांडेपारकर हे कदंब महामंडळात कंडक्टर म्हणून कामाला होते. शुक्रवारी रात्री आठच्या दरम्यान कुडचडे बाजारातून स्कूटरने घरी परतत असताना बेताळ मंदिराजवळ पावसाच्या पाण्यामुळे निसरडय़ा बनलेल्या रस्त्यावर त्यांना अपघात घडला. त्यात ते किरकोळ जखमी झाले होते. सदर अपघातानंतर त्यांना काकोडा आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. जखम मोठी नसल्याने त्यांनी घरी जाणे पसंत केले होते. मात्र त्याच रात्री सव्वादहाच्या दरम्यान त्यांचा रक्तदाब एकदम खाली उतरल्याने त्यांना तातडीने परत काकोडा आरोग्य केंद्रात हलविण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
शवचिकित्सेसाठी मृतदेह मडगावच्या हॉस्पिसियोत पाठविण्यात आला. मृतदेहाचा ताबा मिळाल्यानंतर त्यावर वाडे-कुर्डी गावात अंत्यसंस्कार करण्यात आले. कदंब कर्मचारी, स्थानिक नागरिकांनी यावेळी उपस्थिती लावून त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांच्यापश्चात पत्नी, दोन कन्या, भाऊ असा परिवार आहे.