दुभाजकाला दुचाकी आदळून घटना, मुलगी जखमी
प्रतिनिधी /बेळगाव
दुभाजकाला दुचाकी आदळून कोल्हापूर सर्कल जवळ बुधवारी मध्यरात्री झालेल्या अपघातात अगरकर रोड, टिळकवाडी येथील एक महिलेचा मृत्यू झाला तर तीची मुलगी जखमी झाली. होंडा ऍक्टीव्हावरुन घरी जाताना ही घटना घडली आहे. अपघातात महिलेचा मृत्यू झाल्याने टिळकवाडी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
पूजा महेश गावडे (वय 46, रा. अगरकर रोड, टिळकवाडी) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. तीची मुलगी तन्वी (वय 16) ही जखमी असून तीला उपचारासाठी खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. वाहतूक उत्तर विभाग पोलीस स्थानकात या अपघाताची नोंद झाली आहे.
घटनेची माहिती मिळताच वाहतूक उत्तर विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीशैल गाभी व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पूजा व तन्वी या दोघी माय-लेक एका कार्यक्रमानिमित्त केए 22 ईव्ही 7350 क्रमांकाच्या होंडा ऍक्टीव्हावरुन कोल्हापूरला गेल्या होत्या.
कोल्हापूर येथील कार्यक्रम आटोपून रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास या दोघी दुचाकीवरुन बेळगावला निघाल्या. मध्यरात्री 2.20 वाजण्याच्या सुमारास त्या कोल्हापूर सर्कल जवळ पोहोचल्या. दुभाजकाला दुचाकी आदाळून मायलेक खाली पडल्या. अपघातात गंभीर जखमी झालेल्या पूजा यांना सिव्हिल हॉस्पिटलला हलविताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. पूजा यांच्या पश्चात दोन मुली, जावई असा परिवार आहे. वाहतूक उत्तर विभाग पोलीस पुढील तपास करीत आहेत.