वार्ताहर/ पुसेगाव
खटाव तालुक्यातील जाखणगाव शेजारील पोवई शिवारात दुचाकी आणि चार चाकी गाडीच्या अपघातात दोन तरुण कीर्तनकारांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर एक कीर्तनकार गंभीर जखमी झाले. कुणाल शंकर जाधव आणि अभिजीत मधुकर येलगे हे अपघातात मृत्यू पावले. बाबा निवृत्ती जगदाळे जखमी झाले असून त्यांच्यावर सातारा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
अपघाताबाबत संकेत जाधव यांची फिर्याद आणि पुसेगाव पोलीसांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार भोसरे ( ता. खटाव ) येथील कीर्तनकार कुणाल शंकर जाधव ( वय 23 ) हे शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजता त्यांच्या दुचाकीवरुन सहकारी कीर्तनकार अभिजीत येलगे ( वय 36, रा . देवाची आळंदी ) आणि बाबा निवृत्ती जगदाळे ( रा. बोथे, ता. माण ) यांना घेऊन पुसेगावच्या दिशेने निघाले होते. औंध – पुसेगाव रोडवरील पोवई माळ परिसरात टाटा सफारी ( एमएच 12 जेएन 2500 ) या चार चाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील तिघेही गंभीर जखमी होवून रस्त्यावर पडले. त्याच रस्त्यावरुन प्रवास करणारे अक्षय जाधव यांनी जखमींना खाजगी आणि शासकीय रुग्णवाहिकेतून पुसेगाव आरोग्य केंद्र आणि सिव्हिल हॉस्पिटल सातारा येथे पोहचविण्याची व्यवस्था केली. कीर्तनकार कुणाल जाधव यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे पुसेगाव येथील वैद्यकीय अधिकायांनी सांगितले. गंभीर जखमी झालेले देवाची आळंदी येथील कीर्तनकार अभिजीत येलगे यांचा सिव्हिल हॉस्पिटल सातारा येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. बोथे येथील बाबा जगदाळे यांच्यावर सातायातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
सदर अपघाताची फिर्याद मयत कुणाल जाधव यांचे भाऊ संकेत जाधव यांनी पुसेगाव पोलीस ठाण्यात दिली आहे. अविचाराने, निष्काळजीपणे रस्त्याच्या परिस्थिकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगाने वाहन चालवत अपघात करुन जखमींना उपचारासाठी घेऊन न जाता पळून जाणे तसेच मृत्यू आणि गंभीर दुखापतीस कारणीभूत ठरला म्हणून चारचाकी गाडीचा चालक जीवन पांडुरंग जाधव ( गादेवाडी ) याच्या विरोधात पुसेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरिक्षक बाळासाहेब लोंढे करत आहेत.