दोन्ही संघांचे सुपर-12 फेरीत लागोपाठ विजय, फिंच-वॉर्नरला सूर सापडल्याने ऑस्ट्रेलियाला दिलासा
दुबई / वृत्तसंस्था
आयसीसी टी-20 विश्वचषक जेतेपदाचे प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱया इंग्लंडचा आज (शनिवार दि. 30) कट्टर, पारंपरिक प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियाविरुद्ध कस लागेल, असे संकेत आहेत. दोन्ही संघ अपराजित असल्याने सुपर-12 फेरीत पहिल्या गटातील आजची ही लढत दोन्ही संघांसाठी विशेष महत्त्वाची असेल. भारतीय प्रमाणवेळेनुसार, सायंकाळी 7.30 वाजता या लढतीला सुरुवात होणार आहे.
यंदा सुपर-12 फेरीत एकीकडे, इंग्लंडने प्रबळ दावेदार म्हणून स्वतःला अधोरेखित केले आहे तर दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाचा संघ देखील दमदार प्रदर्शनासह पुढे सरसावला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध लो स्कोअरिंग लढतीत ऑस्ट्रेलियन फलंदाजी अगदीच प्रभावी ठरली नसली तरी गुरुवारी श्रीलंकेविरुद्ध धावांचा पाठलाग करताना त्यांनी अतिशय तंत्रशुद्ध खेळ साकारला आहे.
ऍरॉन फिंच व डेव्हिड वॉर्नर यांना सूर सापडला, ही लंकेविरुद्ध लढतीत त्यांच्यासाठी अतिशय जमेची बाजू ठरली. यापूर्वी सनरायजर्स हैदराबाद या आयपीएल प्रँचायझीतर्फे खेळताना वॉर्नर अतिशय खराब फॉर्ममध्ये होता. येथे मात्र त्याने आपल्या टीकाकारांना बॅटच्या माध्यमातूनच चोख प्रत्युत्तर दिले आहे.
जोश हॅझलवूड, मिशेल स्टार्क व पॅट कमिन्स या जलद त्रिकुटाने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ साकारला असून लेगस्पिनर ऍडम झाम्पाने देखील लंकेविरुद्ध आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. वास्तविक, लंकेने ऑस्ट्रेलियाविरुद्ध फ्लाईंग स्टार्ट नोंदवला. पण, झाम्पाने मधल्या षटकात घेतलेल्या दुहेरी बळीमुळे या लढतीचे चित्र पालटले. ग्लेन मॅक्सवेल व मार्कस स्टोईनिस यांना 4 षटकात 51 धावा मोजाव्या लागल्या, ही कांगारुंची एकमेव चिंता ठरली होती.
इंग्लिश संघ उत्तम बहरात
यापूर्वी पहिल्या दोन लढतीत विंडीज व बांगलादेशविरुद्ध धडाकेबाज विजय मिळवले असल्याने इंग्लंडचा संघ देखील सध्या बहरात राहिला आहे. येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध मात्र मालिकेत प्रथमच त्यांचा पूर्ण कस लागेल, अशी चिन्हे आहेत. दोन्ही सामन्यात गोलंदाजीची सुरुवात करणारा मोईन अली विशेष लक्षवेधी ठरत आला असून सध्या त्याच्या खात्यावर 4 बळी नोंद आहेत. जलद गोलंदाजीच्या आघाडीवर मिल्सने विशेषतः डेथ ओव्हर्समध्ये लक्षवेधी मारा केला आहे.
लेगस्पिनर अदिल रशिदला बांगलादेशविरुद्ध फारसा सूर सापडला नाही. मात्र, येथे ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध तो नियंत्रित टप्प्यावर, भेदक मारा करु शकेल, अशी संघव्यवस्थापनाला आशा असणार आहे. लंकेविरुद्ध लढतीनंतर वॉर्नरने ‘डय़ू फॅक्टर’बद्दल आपले मत नोंदवले. पण, तूर्तास नाणेफेक जिंकणारे संघ धावांचा पाठलाग करण्यावरच अधिक भर देत आल्याचे चित्र आहे.
प्रतिस्पर्धी संघ
इंग्लंड ः इयॉन मॉर्गन (कर्णधार), मोईन अली, जोनाथन बेअरस्टो, सॅम बिलिंग्ज, जोस बटलर, टॉम करण, ख्रिस जॉर्डन, लियाम लिव्हिंगस्टोन, डेव्हिड मलान, मिल्स, अदिल रशिद, जेसॉन रॉय, डेव्हिड विली, ख्रिस वोक्स, मार्क वूड.
ऑस्ट्रेलिया ः ऍरॉन फिंच (कर्णधार), ऍस्टॉन ऍगर, पॅट कमिन्स, जोश हॅझलवूड, जोश इंग्लिस, मिशेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ, मिशेल स्टार्क, मार्कस स्टोईनिस, मिशेल स्वेप्सन, मॅथ्यू वेड, डेव्हिड वॉर्नर, ऍडम झाम्पा. सामन्याची वेळ ः सायं. 7.30 वा.