ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
मुलायमसिंह यादव यांच्या सून अपर्णा यादव यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपच्या दिल्ली मुख्यालयात उत्तर प्रदेश भाजपचे अध्यक्ष स्वतंत्र देव सिंग यांच्या उपस्थितीत अपर्णा यांनी कमळ हाती घेतले. यावेळी उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य उपस्थित होते.
उत्तरप्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच समाजवादी पक्षाने भाजपच्या दोन बडय़ा मंत्र्यांसह काही आमदारांना फोडून भाजपला झटका दिला. त्यानंतर भाजपने थेट यादवांच्या घरातच फुट पाडत मुलायमसिंह यांची धाकटी सून अपर्णा यादव यांना भाजपाचे सदस्यत्त्व दिले. अपर्णा यादव यांनी भाजपमध्ये प्रवेश करताच अखिलेश यादव आणि त्यांच्या पक्षावर जोरदार हल्ला चढवला. सपाच्या राजवटीत गुंडगिरीचे इतके कौतुक होते. त्यामुळे मुली आणि महिला सुरक्षित नाहीत. संध्याकाळ होताच घरांचे दरवाजे बंद करावे लागतात. माझ्यासाठी राष्ट्र सर्वात महत्त्वाचे आहे, म्हणूनच माझ्यावर नेहमीच पंतप्रधानांचा प्रभाव आहे.
अपर्णा सिंह यांना यावेळीही लखनौ कँटमधून निवडणूक लढवायची होती. पण अखिलेश यादव यांनी कुटुंबातील कोणालाही तिकीट देणार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे अपर्णा यादव नाराज होत्या. अखेर त्यांनी कौटुंबिक पक्ष सोडून भाजपात जाणे पसंत केले. अपर्णा यादव या मुलायम सिंह यादव यांचा मोठा मुलगा प्रतिक यादव यांच्या पत्नी आहेत. अपर्णा आणि प्रतीक यांचे लग्न 2010 मध्ये मुलायम सिहांचे गाव सैफईमध्ये झाले होते. त्यांना आधीपासूनच राजकारणाची आवड होती. अपर्णा समाजवादी पक्षात असूनही त्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर स्तुती करताना दिसत होत्या. अपर्णा यांनी लखनऊच्या कँट मतदारसंघातून 2017 ला विधानसभा निवडणूक लढवली होती. पण निवडणुकीत त्यांचा भाजपच्या उमेदवार रिटा बहुगुणा जोशी यांनी पराभव केला होता.