प्रतिनिधी / शिरोळ
बारा वर्षाच्या अल्पवयीन मुलीस दोन अनोळखी इसमांनी चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून व मारण्याची भीती घालून तिला मोटरसायकलवरून पळवून नेण्याचा प्रयत्न केला. सदर मुलीने या अनोळखी इसमाला प्रतिकार करून चावा घेऊन पळून गेली. त्यामुळे तिचा बचाव झाला. याबाबत मुलीच्या वडिलांनी शिरोळ पोलिसात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी जमादार रा. आगर भाग ता. शिरोळ यांची मुलगी नेहमीप्रमाणे आज सकाळी दहा वाजता शाळेला जाताना दोन अनोळखी इसमानी चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून व जीवे मारण्याची भीती दाखवून तिचा हात पकडला. तिला गाडीवरून पळून घेऊन जाण्याचा प्रयत्न करीत होते. यावेळी सदर मुलीने प्रसंग ओळखून जोरदार प्रतिकार करीत हिसडा मारून अनोळखी व्यक्तींमधील एकाचा चावा घेऊन पळ काढला. त्यामुळे सुदैवाने ती मुलगी बचावली. ही घटना आज बुधवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास मौजे आगर येथील चव्हाण यांच्या पोल्ट्री फार्मजवळ घडली. या घटनेमुळे या परिसरात खळबळ माजली आहे. सदर घटनेचा गुन्हा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक एम. एम. माळी या करीत आहेत.