आर्थिक व्यवहारातून अपहरण : आणखी एका फरारी आरोपीचा शोध जारी
प्रतिनिधी /बेळगाव
हुबळी येथील युवकाचे अपहरण केल्याप्रकरणी एपीएमसी पोलिसांनी अटक केलेल्या मिरज व इचलकरंजी येथील तिघा जणांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. आर्थिक व्यवहारातून ही घटना घडली असून आणखी एका फरारी आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.
शहानवाज चमनशेख (वय 42), शहाजहान ऊर्फ अज्जू चमनशेख (वय 36) दोघेही राहणार मिरज, अभिजित शेट्टी (वय 32) रा. इचलकरंजी अशी त्यांची नावे आहेत. एपीएमसीचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ हिरेमठ, उपनिरीक्षक मंजुनाथ बजंत्री व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे.
हुबळी येथील रविकिरण भट्ट (वय 34) या युवकाचे अपहरण करून त्याच्या पत्नीकडून तीन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या आरोपावरून एपीएमसी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल झाला आहे. 14 जानेवारी रोजी अपहरण झाले होते. 18 जानेवारी रोजी एफआयआर दाखल करण्यात आला होता.
सुरुवातीला पोलिसांनी आठ जणांना अटक केली होती. मिरज व इचलकरंजी येथील तिघांच्या अटकेने आतापर्यंत अटक करण्यात आलेल्यांची संख्या 11 वर पोहोचली आहे. आझमनगर येथील आणखी एक तरुण फरारी असून त्याचा शोध घेण्यात येत आहे. आर्थिक क्यवहारातून ही घटना घडल्याचे प्राथमिक तपासातून उघडकीस आले आहे. बिटकॉईनचा व्यवहारही अपहरणाला कारण आहे का, याची चौकशी करण्यात येत आहे.