वृत्तसंस्था/ कानपूर
‘त्या’ महिलेला कुठल्याही स्थितीत स्वतःच्या 15 वर्षीय मुलीला शोधायचे होते. ती दिवसभर भीक मागायची आणि पोलीस अधिकाऱयाच्या वाहनात डिझेल भरण्यासाठी पैसे द्यायची. या पोलीस अधिकाऱयाने या लाचेच्या बदल्यात तिच्या मुलीला शोधण्याचा शब्द दिला होता. एक महिन्याने प्रतीक्षेची आस संपुष्टात आल्यावर या महिलेने आता पोलीस महासंचालकांकडे दाद मागितली आहे.
उत्तरप्रदेशच्या कानपूर जिल्हय़ातील सनिगवां गावातील ही घटना आहे. पोलीस स्थानक प्रमुख राजपाल सिंग यांच्यावर लाचखोरीचा आरोप आहे. गावातील रहिवासी गुडिया दिव्यांग असून भीक मागून गुजराण करते. त्यांची 15 वर्षांची मुलगी एक महिन्यापासून बेपत्ता आहे. एका विवाहित नातलगानेच तिचे अपहरण केल्याचा संशय आहे.
गुडियाची तक्रार पोलिसांनी नोंदवून घेतली, पण ती माहिती जाणून घेण्यास पोहोचल्यावर तिला हाकलून दिले जात होते. पोलीस स्थानक प्रमुख राजपाल सिंगने या दिव्यांग महिलेला मुलीच्या शोधण्याच्या बदल्यात वाहनात डिझेल भरण्यास सांगितले होते. या महिलेने भीक मागून आतापर्यंत 10-12 हजार रुपयांचे डिझेल सिंग यांच्या वाहनात भरले आहे.
आरोपी अधिकारी निलंबित
प्रकार समोर येताच पोलीस महासंचालकांनी संबंधित अधिकाऱयाला निलंबित केले आहे. तर या प्रकरणाची विभागीय चौकशी केली जात आहे. अपहृत मुलीचा शोध घेण्यासाठी 4 पथके स्थापन करण्यात आली आहेत.