सभागृह नेते विनायक सिंहासने : महापौरांना पत्र
सांगली : प्रतिनिधी
सांगली-मिरज रस्त्यावरील वादग्रस्त ‘अपेक्स’ रुग्णालयाचा चौकशी अहवाल महासभेसमोर ठेवावा, अशी मागणी सभागृह नेते विनायक सिंहासने यांच्यासह भाजप पदाधिकारी, नगरसेवकाच्या शिष्टमंडळाने महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्याकडे केली आहे. माजी सभागृह नेते युवराज बावडेकर, नगरसेवक राजेंद्र कुंभार, संघटन सचिव दीपक माने, प्रियानंद कांबळे आदी यावेळी उपस्थित होते.
महापौर सूर्यवंशी यांना या मागणीचे निवेदन देण्यात आले. यामध्ये कोरोना काळात सांगली-मिरज रस्त्यावरील अपेक्स रुग्णालयातील भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला होता. हलगर्जीपणामुळे अनेक निष्पाप रुग्णाचे बळी गेले होते. या विरोधात भाजपने आवाज उठवला होता. रुग्णालयातील कारभाराची चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर महापालिका प्रशासनाने संबंधित रुग्णालयाचा कोविड सेंटरचा परवाना रद्द करत रुग्णालय बंद केले होते. रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचारी यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी १९ जुलै २०२१ रोजी महासभा सुरू असताना तिरडी मोर्चा काढला होता. याच सभेत ‘अपेक्स’ बाबतचा चौकशी अहवाल पुढील सभेत सादर करावा असे आदेश तुम्ही दिले होते. याला आता सात महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला आहे. परंतू आजपर्यत कोणत्याही महासभेत याबाबतचा अहवाल प्रशासनाने सादर केलेला नाही. पुढील सभेत मात्र अपेक्स चा अहवाल सादर करण्याचे आदेश संबंधित विभागाला द्यावेत अशी मागणी केली आहे.