वृत्तसंस्था/ अबु धाबी
तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत अफगाणिस्तानने आयर्लंडवर 2-0 अशी विजयी आघाडी मिळविली. या मालिकेतील रविवारी झालेल्या दुसऱया सामन्यात अफगाणने आयर्लंडचा 7 गडय़ांनी पराभव केला.
या सामन्यात आयर्लंडने 50 षटकांत 9 बाद 259 धावा जमविल्या. त्यानंतर अफगाणने 45.2 षटकांत 3 बाद 260 धावा जमवित हा सामना जिंकला. अफगाणतर्फे ‘सामनावीर’ रेहमत शहाने शानदार नाबाद शतक (103) झळकविले.
आयर्लंडच्या डावात सलामीच्या पॉल स्टर्लिंगने 132 चेंडूत 128 धावा जमविल्या पण स्टर्लिंगचे हे शतक वाया गेले. कँफरने 52 चेंडूत 47 धावा जमविल्या. स्टर्लिंग आण कँफर यांनी चौथ्या गडय़ासाठी 100 चेंडूत 106 धावांची भागिदारी केली. स्टर्लिंगचे हे वनडे क्रिकेटमधील 11 वे शतक असून त्याने आयर्लंड संघातील माजी फलंदाज विलीयम पोर्टरफिल्डच्या विक्रमाशी बरोबरी केली. आयर्लंडचा माजी क्रिकेटपटू आणि संघाचे व्यवस्थापक रॉय टोरेन्सचे शनिवारी निधन झाले असून स्टर्लिंगने आपले हे शतक टोरेन्सच्या स्मृतीला अर्पण केले. आयर्लंडच्या डावात शेवटचे पाच गडी 51 चेंडूत 49 धावांची भर घालत तंबूत परतले. अफगाणतर्फे नवीन उल हकने 42 धावांत 4 तर मुजिब उर रेहमानने 46 धावांत 3 तर नईब आणि रशीद खान यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
प्रत्त्युरादाखल खेळताना अफगाणच्या डावात सलामीचा गुरबाजने 26 चेंडूत 2 षटकारांसह 31 तर अहमदीने 24 चेंडूत 16 धावा जमविल्या. रेहमत शहा आणि शाहीदी यांनी तिसऱया गडय़ासाठी 184 धावांची भागिदारी केली. रेहमत शहाने 109 चेंडूत नाबाद 103 तर शाहीदीने 100 चेंडूत 82 धावा झळकविल्या. कर्णधार अफगाणने 13 चेंडूत नाबाद 21 धावा केल्या. या मालिकेतील पहिल्या सामन्यात अफगाणच्या गुरबाजने पदार्पणातच शतक झळकविले होते. अफगाणला विजयासाठी 21 धावांची जरूरी असताना कर्णधार अफगाणने डावातील 45 व्या षटकांत 2 षटकार आणि 1 चौकार ठोकत विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. या मालिकेतील शेवटचा सामना मंगळवारी खेळविला जाणार आहे.
संक्षिप्त धावफलक
आयर्लंड 50 षटकांत 9 बाद 259 (स्टर्लिंग 128, कँफर 47, टेक्टर 24, नवीन उल हक 4-42, मुजिब उर रेहमान 3-46), अफगाण 45.3 षटकांत 3 बाद 260 (गुरबाज 31, अहमदी 16, रेहमत शहा नाबाद 103, शाहीदी 82, अफगाण नाबाद 21, सिमी सिंग, मँपेती आणि कँफर प्रत्येकी 1 बळी).