वृत्तसंस्था/ अबु धाबी
तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत अफगाणने झिम्बाब्वेवर 2-0 अशी विजयी आघाडी मिळविली. या मालिकेतील शुक्रवारी झालेल्या दुसऱया सामन्यात अफगाणने झिम्बाब्वेचा 45 धावांनी पराभव केला. अफगाण संघातील मोहम्मद नबीला सामनावीर म्हणून घोषित केले.
या दुसऱया सामन्यात प्रथम फलंदाजी करताना अफगाणने 20 षटकात 5 बाद 193 धावा जमविल्या. त्यानंतर झिम्बाब्वेचा डाव 17.1 षटकात 148 धावांत आटोपला.
अफगाणच्या डावात करीम जनतने 38 चेंडूत 4 षटकार आणि 3 चौकारांसह 53 तर उस्मान घणीने 34 चेंडूत 2 षटकार आणि 5 चौकारांसह 49 तसेच मोहम्मद नबीने 15 चेंडूत 4 षटकार आणि 2 चौकारांसह 40 धावा झोडपल्या. सलामीच्या गुरबाजने 2 चौकारांसह 9, एन. झद्रनने 12, कर्णधार असगर अफगाणने 1 षटकार आणि 1 चौकारासह 7 चेंडूत नाबाद 14 तर रशिद खानने 1 चौकारासह नाबाद 9 धावा जमविल्या. अफगाणच्या डावात एकूण 11 षटकार आणि 15 चौकार नोंदविले गेले. झिम्बाब्वेतर्फे मुझरबनीने 2 तर निग्रेव्हा, तिरिपानो आणि ब्युरेल यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना झिम्बाब्वेच्या डावात रेयान ब्युरेलने 29 चेंडूत 3 षटकार आणि 1 चौकारासह 40, तिरिपानोने 14 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 24, मुसाकंदाने 15 चेंडूत 3 चौकारांसह 22, मुतुम्बामीने 21 चेंडूत 1 चौकारासह 21, सिकंदर रजाने 2 चौकारांसह 15 धावा जमविल्या. झिम्बाब्वेच्या डावात 4 षटकार आणि 13 चौकार नोंदविले गेले. अफगाणतर्फे रशिद खानने 30 धावांत 3, नवीन उल हक आणि मोहम्मद नबी यांनी प्रत्येकी 2 तसेच हमजा, फरीद अहमद आणि करीम जनत यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक
अफगाण- 20 षटकात 5 बाद 193 (जनत 53, घणी 49, नबी 40, मुझरबनी 2/44), झिम्बाब्वे- 17.1 षटकात सर्वबाद 148 (ब्युरेल 40, तिरिपानो 24, मुसाकंदा 22, रशिद खान 3/30, नवीन उलहक 2/28, मोहम्मद नबी 2/20, हमजा 1/17, फरिद अहमद 1/21, जेनत 1/27).