मशिदीत बॉम्ब बनवत असताना दुर्घटना
काबूल / वृत्तसंस्था
अफगाणिस्तानच्या दौलताबाद जिह्यातील किल्तान येथे एका मशिदीमध्ये झालेल्या स्फोटात 30 जणांचा मृत्यू झाला आहे. अफगाणिस्तानमध्ये एका मशिदमध्ये काही तालिबानी दहशतवादी बॉम्ब बनवत असताना ही दुर्घटना घडली. या बॉम्बचा मशिदीतच स्फोट होऊन 30 दहशतवाद्यांचा मृत्यू झाला आहे. तालिबान्यांनी या स्फोटात मृत्यू झाल्याचे वृत्त फेटाळले असले तरी अफगाणिस्तानी सैन्याने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
बॉम्ब निर्मितीसाठी तालिबानी दहशतवादी मशिदीत एकत्र जमले होते. भूसुरुंग आणि बॉम्ब बनवत असतानाच मोठा स्फोट झाला. मृतांपैकी 24 दहशतवादी हे तालिबानी होते तर इतर 6 दहशतवादी देशाबाहेरील असल्याचे समजते. काही दहशतवादी स्फोट आणि गोळीबार करून हा भागात ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात होते. पण तप्तूर्वीच स्फोट झाल्यामुळे तालिबानी यंत्रणांना मोठा हादरा बसला आहे.