ऑनलाईन टीम / काबुल :
उत्तर अफगाणिस्तानमधील सामंगन प्रांतात सोमवारी एका कारमध्ये भीषण आत्मघाती स्फोट झाला. यानंतर अफगाण सुरक्षा दल आणि हल्लेखोरांमध्ये गोळीबार झाला. मिळालेल्या माहितीनुसार गोळीबार अजूनही सुरू आहे. या स्फोटात अनेक जण जखमी झाले आहेत.
प्रांतीय रुग्णालयाचे प्रमुख अब्दुल खलील मुसादिक यांनी सांगितले की, या हल्ल्यात जखमी झालेल्यांची संख्येबाबत अजून निश्चित माहिती मिळाली नसून कमीत कमी 43 जण जखमी झाले असावेत असा अंदाज आहे. यामध्ये नागरिकांसोबत लहान मुलांचाही समावेश आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
प्रांतीय परिषदेचे उपप्रमुख मोहम्मद हाशीम सरावरी यांनी सांगितले की, हल्लेखोरांनी स्थानिक गुप्तचर विभागाला लक्ष्य केले होते. अजून पर्यंत या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही अतिरेकी संघटनेने घेतली नाही आहे. पण या भागात तालिबान सक्रिय असून सध्याच्या काळात त्यांच्याकडून होणाऱ्या हल्ल्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे.
तसेच या भागात काही प्रतिद्वंद्वी आहेत तर काही इस्लामी दहशतवादी देखील आहेत. त्यातील अनेकजण उज्बेकिस्तान इस्लामिक आंदोलनाशी जोडलेले आहेत.