अमेरिकेकडून घोषणा ः चीनकडून पूर्वीच मदत जाहीर
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
अफगाणिस्तानवर तालिबानचा कब्जा आणि अंतरिम सरकारच्या स्थापनेनंतर अमेरिकेने सोमवारी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेने अफगाणिस्तानच्या लोकांना आर्थिक मदत करण्याची घोषणा केली आहे. अफगाणिस्तानच्या जनतेसाठी सुमारे 64 दशलक्ष डॉलर्सची मदत अमेरिका करणार आहे.
संयुक्त राष्ट्रसंघातील अमेरिकेच्या प्रतिनिधी लिंडार थॉम्पसन-ग्रीनफील्ड यांनी आर्थिक मदत मानवी सहाय्याच्या स्वरुपात करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. अफगाणिस्तानची स्थिती गंभीर आहे. अशा स्थितीत अमेरिकेने मानवी सहाय्याच्या स्वरुपात 64 दशलक्ष डॉलर्स देण्याचे आश्वासन दिले आहे. प्रत्यक्षस्थितीबद्दल अधिक जाणून घेतल्यावर भविष्यात अधिक रक्कम देण्यासंबंधीही विचार केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
अमेरिकेपूर्वी चीनने देखील अफगाणिस्तानला मदत देण्याची घोषणा केली आहे. चीनने 31 दशलक्ष डॉलर्सची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली होती. यात खाद्यसामग्रीचा पुरवठा आणि कोरोनावरील लसी सामील आहेत.