काबुल
वर्षाअखेपर्यंत अफगाणिस्तानात उपासमारीने 10 लाखापेक्षा जास्त मुलांचा मृत्यु होण्याची भीती जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रवक्त्या मार्गारेट हॅरीस यांनी यासंबंधीची माहिती नुकतीच दिली आहे. अफगाणिस्तानात सुमारे 32 लाख मुलांना उपासमारीच्या समस्येला या वर्षी तोंड द्यावं लागणार असल्याचे सांगितले जात आहे. अफगाणिस्तानात वर्षाअखेर तापमान शुन्यापर्यंत जाण्याची शक्यता आहे. या शितलहरामुळेही मुलांचा मृत्यु होण्याची भीती आहे. तालिबानने ताबा घेतल्यानंतर तर अफगाणिस्तानची स्थिती आणखी चिंताजनक होताना दिसत असल्याचे संघटनेने म्हटले आहे. अफगाणिस्तानात वर्षअखेरपर्यंत 10 लाख मुलांचा उपासमारीने मृत्यु होण्याची शक्यता संघटनेने व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे 32 लाख मुलांवर हे संकट ओढवणार असल्याचे संयुक्त राष्ट्र संघाच्या आरोग्य विभागाने म्हटले आहे. तिकडे अफगाणिस्तानात खाद्यान्नाची टंचाई भेडसावत असून त्याचा परिणाम मुलांवर अधिक होताना दिसणार आहे. काही लोक आपल्या मुलांना विकत असल्याचे दिसून आले आहे.