ऑनलाईन टीम / काबुल :
तालिबानने सत्ता काबीज केल्यानंतर अफगाणिस्तानातील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. अनेक अफगाणी नागरिक देश सोडून जाण्यासाठी काबुल विमानतळावर मागील 10 दिवसांपासून गर्दी करत आहेत. मात्र, आता अफगाणी नागरिकांना देशाबाहेर पडता येणार नाही. तालिबानने देशाबाहेर जाणाऱ्या अफगाणी नागरिकांना रोखण्यासाठी काबुल विमानतळाबाहेर चौक्या उभ्या केल्या आहेत.
तालिबानचे प्रवक्ते जबीउल्लाह मुजाहिद यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, काबुल विमानतळाकडे जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत. अफगाणी नागरिकांना यापुढे विमानतळावर पोहोचता येणार नाही. केवळ परदेशी नागरिकांनाच विमानतळापर्यंत जाण्याची परवानगी दिली जाईल.
काबूल विमानतळावर असलेल्या सर्व अफगाण नागरिकांनी माघारी परतावे. अशा लोकांना तालिबानकडून शिक्षा होणार नाही, असेही मुजाहिद यांनी सांगितले.